रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन
By संदीप शिंदे | Updated: June 28, 2024 17:22 IST2024-06-28T17:21:57+5:302024-06-28T17:22:45+5:30
गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले.

रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन
निलंगा : विविध विकासकामे व अत्यावश्यक सेवा मिळाव्या, या मागणीसाठी लांबोटा येथील युवकांनी थाळीनाद आंदोलन करून ग्रामपंचायतीला जागे करण्यासाठी शुक्रवारी आंदोलन केले.
निलंगा शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांबोटा गावात गैरसोय असून मुख्य रस्त्यापासून लांबोटा गावात येणारा एक किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. यावरील खड्ड्याचे आंदोलनकर्त्यांनी पूजन केले. गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले. गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यावर फिल्टर बसवावे. नळ कनेक्शनसाठी विनाकारण अकराशे रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले जात आहेत. ते घेऊ नये. गावातील अवैध दारूवर बंदी करावी. गावातील नाल्या पूर्ण बुजल्या आहेत. त्या खुल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. सरपंच हजर नसल्याने उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक कार्यालयाकडे फिरकतच नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. दोन महिन्यांपूर्वी सिमेंट रस्ता करण्यात आला. मात्र, सिमेंट रस्ताच पाच फूट जमिनीत रुतला व पूर्णत: खराब झाला असून, याची त्वरित चौकशी करावी व संबंधित गुत्तेदाराचा परवाना जप्त करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
सरपंच गैरहजर; दुसऱ्याकडे पदभार द्यावा...
गावाला कायमस्वरूपी सरपंच नेमावा किंबहुना सरपंच कायम गैरहजर असल्यामुळे इतर सदस्यांची सरपंच म्हणून निवड करावी व गावाचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात प्रसाद देशमुख, उमेश पाटील, विष्णू मुंजाळ, ज्ञानेश्वर दुपटणे, शमियोउद्दीन शेख, जहरुद्दीन शेख, ओम पाटील, चंद्रकांत बिराजदार, अजित काळे, संदीप आवटे आदींसह युवकांचा सहभाग होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले.