वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन तीव्र; कामावर बहिष्कार टाकल्याने रुग्णसेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 07:12 PM2022-03-14T19:12:09+5:302022-03-14T19:14:57+5:30
विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापकांना सेवेत नियमित करून घेण्यात यावे व त्यांचे समावेशन करण्यात यावे, वैद्यकीय अध्यापकांना ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे ७ व्या वेतन आयोगातही आश्वासित प्रगती योजना केंद्र व इतर राज्यांप्रमाणे लागू करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षकांनी सोमवारी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र केले आहे. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.
तदर्थ पदोन्नतीच्या वैध मार्गास फाटा देणाऱ्या कंत्राटी पद्धतीने होऊ घातलेल्या अवैध नेमणुकांबाबतचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, वैद्यकीय शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगानुसार प्रलंबित विविध भत्ते तत्काळ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावेत, राजस्थान व झारखंड या राज्यांच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना वैद्यकीय अध्यापकांना लागू करण्यात यावी, तदर्थ पदोन्नती व कालबद्ध पदोन्नती धोरणांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी एमएसएमटीएच्यावतीने असहकार करीत यापूर्वी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कॅण्डल मार्च, अधिष्ठातांना घेराव, घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल न घेतल्याने सोमवारपासून रुग्णसेवेवर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी डॉ. गणेश बंदखडके, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. अजित नागावकर, डॉ. शैलेश चौहाण, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. उमेश लाड, डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. भाऊराव यादव, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. विमल होळंबे, डॉ. सुषमा जाधव आदी उपस्थित होते.
पदव्युत्तर, निवासी डॉक्टरांवर ताण...
एमएसएमटीएच्या आंदोलनात येथील जवळपास ७० वैद्यकीय शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेचा ताण पदव्युत्तर, निवासी डॉक्टरांवर पडल्याचे पहावयास मिळाले. सोमवारी येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची मोठी गर्दी होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांचा संप असल्याने मोठी अडचण झाली. वैद्यकीय शिक्षकांचे कक्ष दिवसभर रिकामे असल्याचे पहावयास मिळाले.