पॅसेंजर उतरताना ऑटारिक्षाला भरधाव कारने उडविले; चार प्रवासी गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Published: June 2, 2023 03:48 PM2023-06-02T15:48:23+5:302023-06-02T15:54:25+5:30
लातूर-नांदेड महामार्गावर अपघात; या अपघातात ऑटोरिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत
लातूर : महामार्गालगत थांबविण्यात आलेल्या ऑटाेला भरधाव कारने उडविल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघातलातूर शहरालगतच्या महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत कृषी महाविद्यालयासमोर लातूर - नांदेड महामार्गावर शुक्रवारी दुपारी झाला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरानजीक नांदेड महामार्गावर असलेल्या कृषी महाविद्यालयासमाेर ऑटाे चालकाने महामार्गालगत थांबविला हाेता. दरम्यान, ऑटाेमध्ये प्रवाशांची (एमएच २४ एटी २६९८) चढ-उतार करत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच ०५ एनएस १८२७) ऑटाेला उडविले. या अपघातात ऑटाे रस्त्यालगतच्या खड्ड्यात काेसळला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीमध्ये दीपक हरिभाऊ राठोड (रा. फरदपूर, ता. रेणापूर), तेजस्विनी राजाराम फुंदे (रा. वांगदरी, ता. रेणापूर), उज्ज्वला श्रीराम राठोड (रा. गंगाखेड, जि. परभणी) आणि ऑटोचालक प्रथमेश शिवाजी कांबळे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस हेड काॅन्स्टेबल पांडुरंग काेकणे यांनी दिली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वळणावर रस्त्यावर झाला भीषण अपघात...
ऑटोचालक प्रथमेश कांबळे हा लातूर शहराकडून कोळपा गावाकडे प्रवाशांची वाहतूक करत हाेता. दरम्यान, ऑटाेतील दोन प्रवासी कृषी महाविद्यालयासमोर महामार्ग लेनच्या बाहेर ऑटो उभा करून उतरवत हाेता. उस्मानाबादकडून नांदेडच्या दिशेने निघालेल्या कारने ऑटाेला पाठीमागून जाेराने उडविले. दरम्यान, लातूर - नांदेड महामार्गावरील वळण रस्त्यावर हा अपघात झाला. यात ऑटाेसह कारचे माेठे नुकसान झाले.