औशात श्वानांचा धुमाकूळ; पंधरा जणांना घेतला चावा, नागरिकांत भीती
By राजकुमार जोंधळे | Published: May 10, 2024 11:40 PM2024-05-10T23:40:17+5:302024-05-10T23:42:02+5:30
जखमीमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : शहरातील हाश्मी नगरासह अन्य भागात शुक्रवारी श्वानांनी धुमाकूळ घालत दोन चिमुकल्यांसह पंधरा जणांना चावा घेतल्याची घटना घडली. औसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जखमींनी गर्दी केली हाेती. या घटनेने औसा शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस असून बहुतांश मुले घरीच आहेत. ते घरासमोरील माेकळ्या जागेत खेळताना अचानकपणे आलेल्या श्वानांनी त्यांना चावा घेण्यास सुरुवात केली.
यावेळी उमेर शेख (वय २), हुमेरा शेख (वय ४), परी साबळे (वय ६), ताहेर कुरणे (वय १२), सलीम सय्यद (वय ४०), आजीम शेख (वय १७), वाहेद कुरेशी (वय ४८ रा. औसा), पद्मिणी ढाके (वय ६०), तिम्मा पवार (वय ४५), पूजा कदम, केशव कदम, राधिका कदम हे श्वानाने चावा घेतल्याने जखमी झाले. यांनी औसा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतला आहे. घरासमोरील लहान मुलांसह दुकानात काम करणाऱ्या कारागीरांना, शाळकरी मुलांना, वयोवृद्धांसह महिनांना श्वानांनी चावा घेतला आहे.
मनात भीती न बाळगता
उपचार घेण्याची गरज...
श्वानांनी चावा घेतल्यानंतर जखमी झालेल्या नागरिकांनी तातडीने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल हाेत उपचार घ्यावा, त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. श्वानाने चावा घेतला तरी मनात भीती न बाळगता उपचार घ्यावा. - डॉ. बी.सी. थडकर, वैद्यकीय अधिकारी, औसा