पुरात वाहून गेलेल्या हाडोळतीच्या चालकाचा ४० तासनंतर सापडला मृतदेह!
By राजकुमार जोंधळे | Published: September 21, 2022 04:54 PM2022-09-21T16:54:09+5:302022-09-21T16:54:27+5:30
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे वलीमा कार्यक्रमासाठी सोमवारी गेले होते.
लातूर : जिल्ह्यातील हाडोळती (ता.अहमदपूर) येथील पाच तरुण नदीवरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास दपका राजा (ता.मुखेड) परिसरात घडली होती. दरम्यान, यातील चार जणांनी प्रयत्न करुन स्वतःचा जीव वाचविला. तर करचालक मात्र बेपत्ता झाला होता. अखेर ४० तासाच्या शोधानंतर बुधवार दुपारी 'त्या' कारचलकाचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे वलीमा कार्यक्रमासाठी सोमवारी गेले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यावर सोमवारी रात्री ते कारमधून (एम.एच. १४ बी.आर. ३०२१) हडोळतीकडे निघाले होते.ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने दापका राजा नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेला. कार चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने ती कार न थांबवता तशीच पुढे नेली. कार पुलावर आली आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली. कारमधील चार तरूणांनी प्रसंगावधन राखून कारच्या काचा फोडून स्वतःला वाचविले. तर कारचालक अझहर सत्तार शेख (वय २०) हा बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी मंगळवारी दिवसभर मोहीम राबविण्यात आली. पुन्हा बुधवारी सकाळपासून शोध मोहीम सुरु केली. दुपारच्या सुमारास कार चालकाचा मृतदेह सापडला.
तलावाच्या पाण्यात सापडली कार...
नदीच्या समोरील भागात तलाव आहे. पुराच्या पाण्याने तलाव तुडूंब आहे. याच तलावाच्या पाण्यावर ऑइल तरंगताना दिसून आले आणि तेथे शोध घेतला असता कार हाती लागली.
काचा फोडून ते चौघे बाहेर पडले...
पुराच्या पाण्यात कर वाहून जाताना कारमधील शेख निहाल शौकत, मनियार जावेद मोतीन, सय्यद सलमान, गौस बबलू ( सर्व रा. हाडोळती ता. अहमदपूर) हे काचा फोडून बाहेर पडले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उदगीर पालिकेच्या पथकाचेही प्रयत्न...
सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात कारसह चालक वाहून गेला. यातील कारचा शोध मंगळवारी लागला. तर कारचलकाचा शोधासाठी उदगीर नगर पालिकेच्या एनडीआरएफ पथकानेही शोध मोहीम राबविली. अखेर मच्छिमारांच्या प्रयत्नाला बुधवारी दुपारी यश आले.