घरातील कमावता गमावला, अनुकंपा नोकरीने लातूरमध्ये ५९ कुटुंबीयांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 20:02 IST2024-12-27T20:01:34+5:302024-12-27T20:02:18+5:30

लातूर जिल्हा परिषदेत ५९ जण रुजू; काळाच्या आघाताने खडतर जीवनमार्ग कंठणाऱ्या कुटुंबीयांना मिळाला आधार!

The breadwinner of the household lost, a compassionate job supported 59 families in Latur | घरातील कमावता गमावला, अनुकंपा नोकरीने लातूरमध्ये ५९ कुटुंबीयांना आधार

घरातील कमावता गमावला, अनुकंपा नोकरीने लातूरमध्ये ५९ कुटुंबीयांना आधार

लातूर : काळाच्या आघातामुळे शासकीय नोकरदाराचा आकस्मित मृत्यू झाल्याने कुटुंबांवर आभाळ कोसळले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खडतर जीवनमार्ग कंठित होते. शासनाच्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाखाली भरती प्रक्रिया राबवून जिल्हा परिषदेने ५९ पात्र पाल्यांना सरकारी सेवेत रुजू करून घेतले आहे. त्यामुळे या कुटुंबांना पुन्हा मोठा आधार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन, पंचायत, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, बांधकाम, अर्थ, शिक्षण असे विविध विभाग आहेत. या विभागाअंतर्गतच्या काही कर्मचाऱ्यांचे आकस्मित, दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मयत झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबावर मोठे संकट काेसळले. घरकर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधारच हरवला. त्यामुळे काही कुटुंबांसमोर तर दैनंदिन जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला. अशा कुटुंबांना साहाय्य करीत त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या सेवेत घेण्यासाठी गुरुवारी नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली.

निवड झालेल्यांची समुपदेशनाने नियुक्ती...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेसाठी निवड समितीची बैठक झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अनुकंपा तत्त्वानुसार निवड झालेल्या ५९ जणांना नियुक्ती आदेश देत समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली.

प्रतीक्षा यादीत आणखीन २०० जण...
अनुकंपा तत्त्वानुसार नियुक्ती मिळावी म्हणून अर्ज केलेल्यांपैकी २०० जण अजून प्रतीक्षा यादीत आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या निवडीसाठी एकूण ६३ जण पात्र होते. त्यापैकी चौघांची न्यायालयीन प्रकरणे सुरू असल्याने उर्वरित ५९ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी चांगले कार्य करावे...
शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर ५९ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना आधार मिळाला आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी चांगले कार्य करावे आणि कुटुंबाबरोबर प्रशासनाचाही लौकिक वाढावा.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

नियुक्ती आदेश मिळाल्याने आनंद...
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यांनी वर्षभराच्या आत अर्ज करावा लागतो. सीईओ अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक पात्रतेनुसार ५९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच तात्काळ पदस्थापनाही देण्यात आली आहे.
- श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

Web Title: The breadwinner of the household lost, a compassionate job supported 59 families in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.