प्रचार अंतिम टप्प्यात; लातूर जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढतींनी लक्ष वेधले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 07:35 PM2024-11-15T19:35:16+5:302024-11-15T19:35:54+5:30
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी प्रत्येक मतदारसंघातील निवडणुकीचे मैदान गाजत आहे.
लातूर : प्रचार अंतिम टप्प्यात असून, चार दिवसांचा राजकीय खेळ प्रत्येक मतदारसंघात रंजक होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सरळ वाटणाऱ्या काही लढती चुरशीच्या होत असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अखेरपर्यंत रस्सीखेच चालणार आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी प्रत्येक मतदारसंघातील निवडणुकीचे मैदान गाजत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील दुरंगी लढत तिरंगी होताना दिसत आहे. राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. बाबासाहेब पाटील आणि महाविकास आघाडी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यातील लढतीत तिसरे उमेदवार गणेश हाके स्पर्धेत दिसत आहेत. ते जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उभे असून, भाजपचे प्रवक्ते होते. या तिरंगी सामन्यात महायुतीचे आ. बाबासाहेब पाटील सर्वसमाज घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
उदगीरमध्ये सामना राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी होत असून, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर भाजप सोडून तुतारी हाती घेतलेले माजी आ. सुधाकर भालेराव लढत देत आहेत. विकासकामांचा आलेख मंत्री बनसोडे यांची जमेची बाजू आहे. त्याचवेळी दोनवेळा आमदार राहिलेले भालेराव त्यांच्या कामाचा पाढा वाचून दाखवीत आहेत. इथे शरद पवार यांची सभा झाली. परंतु, त्यांनी बनसोडे यांच्यावर कोणतेही भाष्य केले नाही, याची चर्चा होताना दिसते.
निलंग्यामध्ये माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान आहे. काँग्रेसचे अभय साळुंके यांची भाषणे चर्चेत आहेत. मात्र, मंत्रिपद आणि निलंग्याचे नेतृत्व हा मुद्दा महायुती पटवून देत आहे.
औशामध्ये भाजपचे आ. अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेनेचे माजी आ. दिनकर माने यांच्यातील सामना रंगतदार होत असून, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत औश्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सर्वाधिक दिसत आहेत. आ. पवार यांनी विकासकामांची यादी वाचून दाखवीत विरोधकांना तुमचे एक काम सांगा, असे खुले आव्हान दिले आहे.
लातूर शहरात काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख आणि भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, तर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आ. धीरज देशमुख विरुद्ध भाजपचे आ. रमेश कराड यांच्यातील लढत अंतिम टप्प्यातही चर्चेत आहे. दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांचे जाळे आणि कामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मतदार पुढे जाताना दिसत आहेत.