शोरूम चालकाची चलाखी; अपघातग्रस्त कार भंगारात निघाल्याचे सांगून परस्पर केली विक्री
By राजकुमार जोंधळे | Published: August 29, 2022 05:37 PM2022-08-29T17:37:26+5:302022-08-29T17:38:38+5:30
त्रस्त झालेल्या तक्रारदाराची लातूर न्यायालयात धाव ; तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा
लातूर : अपघातातील कार भंगारात निघाल्याचे सांगत परस्पर विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील हडाेळती येथील सचिन देविदास पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांनी शाेरुममधून कार (एम.एच. २४ एडीडब्ल्यू १६३४) खरेदी केली हाेती. केवळ तीन हजारांवर किलाेमीटर धावलेली कार ३० जून २०२० राेजी अपघातग्रस्त झाली. परिणामी, शाेरुममध्ये ती कार दुरुस्तीसाठी दाखल करण्यात आली. दरम्यान, ती कार पूर्णत: भंगारात निघाली आहे. असे सांगून तक्रारदाराकडून आरसी बूक, विमा, आधार कार्ड अशी कागदपत्रे शाेरुमच्या वतीने जमा करुन घेण्यात आली.
मात्र, शाेरुमचे व्यवस्थापक, एजंटाने संगणमत करुन त्या कारची परस्पर विक्री केली. परिरणामी, जिल्हा पाेलीस अधीक्षकांकडे गुणवंत रामदास फावडे, नामदेव बाबुराव उगीले, सादीक इब्राहिम सय्यद यांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी कुठलीही कारवाई न करता उलट तक्रारदाराला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आपल्याला पाेलीस ठाण्यात काेणीच दादा देत नाही म्हणून त्यांनी लातूरच्या न्यायालयात दाद मागितली. वाहनाची विक्री केलेली नाही, परस्पर वाहन विक्री करुन, तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणि स्क्रॅप अर्ज भरुन घेतला...
अपघात घडल्यानंतर कार भंगारात निघाली आहे, असे सांगून तक्रारदाराकडून तिघांनी संगणमत करुन स्क्रॅपसाठीचा अर्ज भरुन घेतला. त्यानंतर आरसी बूक, आधार कार्ड आणि विमा कागदपत्रे घेतली. त्यानंतर तक्रारदाराच्या परस्पर कारची विक्री केली. हा प्रकार समजल्यानंतर तक्रारदाराने पाेलीस ठाण्यात धाव घेतली मात्र, तेथे काेणीही दखल घेतली नाही. पाेलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशाने गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.