पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
By संदीप शिंदे | Published: August 10, 2023 05:11 PM2023-08-10T17:11:37+5:302023-08-10T17:11:57+5:30
ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही.
किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला. तोही उशिराने आल्याने पेरण्यासही विलंब झाला आहे. सध्या पिके बहरात असतानाच मागील १३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
किनगाव परिसरात सध्या दररोज कडक ऊन पडत असून ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. शेतातील नाले व बंधारे कोरडेच आहेत. मध्यम जमीनीवरील पिकांनी माना टाकल्या असून, चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील पिके थोडीशी तग धरून आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे.
किनगाव मंडळामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीन, तूरीचा आहे. तर मुगाचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना जगवण्याची धडपड करीत आहेत. मुगाला सध्या फुले आली असून, त्यावरही मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ते शेतकरी हताशपणे वाळणाऱ्या पिकाकडे बघत आहेत. एकीकडे पिके वाळत आहेत तर दुसरीकडे पीक जगण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.
पाऊस न पडल्यास पिके हातची जाणार...
चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर पिके हातची जातील. हजारो रुपये खर्च करून पेरलेले बी-बियाणे, पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे देवकरा येथील शेतकरी वामनराव गुट्टे यांनी सांगितले.