माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या; वृद्धापकाळातील आजाराने व्यथित होऊन टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 12:24 PM2023-03-05T12:24:19+5:302023-03-05T13:36:18+5:30
वृद्धापकाळातील आजाराच्या मानसिक अवस्थेतून उचलले असावे पाऊल
लातूर - माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील (वय ८०) यांनी रविवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वृद्धापकाळातील आजाराच्या मानसिक अवस्थेतुन त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज निकटवर्तीयांनी वर्तविला आहे.
चंद्रशेखर उर्फ हन्मंत पाटील यांचे लातुरात माजी मंत्री चाकूरकर यांच्या निवासस्थानाजवळच घर आहे. ते दररोज वृत्तपत्र वाचन, चहासाठी चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी येत असत. रविवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे आले होते. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गोळी झाडून घेतली.
चंद्रशेखर पाटील यांचे कुटुंब सधन, समाधानी म्हणून परिचित आहे. दोन्ही मुले वकील आहेत. कौटुंबिक वातावरण आणि सार्वजनिक जीवन उत्तम राहिले आहे. त्यांचे पुत्र वकील लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी आले. शैलेश पाटील चाकूरकर यांना घरातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तेही धावत आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.