ग्रामपंचायतीमधील वाद निवळणार; ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड राहणार
By हरी मोकाशे | Published: July 22, 2023 07:31 PM2023-07-22T19:31:26+5:302023-07-22T19:32:03+5:30
आता गाव कारभाऱ्यांच्या सोईनुसार बदलणार नाही ग्रामसभेचे प्रोसिडिंग!
लातूर : काही गावांतील ग्रामपंचायतीचे कारभारी ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयात आपल्या सोयीचे निर्णय अलगदपणे समाविष्ट करुन त्यानुसार प्रोसिडिंग लिहून घेतात. काही महिन्यानंतर गावात एखादी मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर यासंदर्भात ग्रामसभेत निर्णय घेतल्याचे दाखवून प्रोसिडिंग सर्वांसमाेर सादर करतात. त्यामुळे गावकरी अन् कारभाऱ्यांत वाद निर्माण होण्यास सुरुवात होते. अशा वादांचा निपटारा व्हावा म्हणून केंद्र शासनाने ग्रामसभांच्या कामकाजाच्या नोंदी ॲपद्वारे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ- व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामपंचायत सर्वात महत्त्वाची आहे. गावकऱ्यांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर गावच्या विकासाचे कार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते. प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. ग्रामसभेच्यानिमित्ताने गावकरी समस्या मांडण्याबरोबरच विकासात्मक कामासंदर्भात काही सूचनावजा माहिती देऊन नियोजन सांगतात.
ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती व्हावी म्हणून प्रोसिडिंग लिहिले जाते. दरम्यान, काही गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामसभेतील निर्णयात आपल्या सोयीने बदल करुन तशा पध्दतीने प्रोसिडिंग लिहिल्याचे बऱ्याच वेळेस निदर्शनास येते. अशा घटनांना आळा बसावा. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात आणखीन पारदर्शकता येवून कार्यक्षमता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने आणि राज्याच्या प्रकल्प संचालकांनी ग्रामसभेच्या कामकाजाच्या नोंदी जीएस निर्णय ॲपद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत.
कागदाेपत्री ग्रामसभांना बसणार आळा...
काही गावांमध्ये ग्रामसभा होत नाहीत. केवळ कागदाेपत्री ग्रामसभा होते. अशा गावांतील कारभारी आपल्या सोयीचे निर्णय गावासाठी लागू करतात. परिणामी, गावचा अपेक्षित प्रमाणात विकास होत नाही. आता या नव्या निर्णयाने कागदोपत्री ग्रामसभांना आळा बसणार आहे.
ग्रामसभेचा द्यावा लागणार सारांश...
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत जीएस निर्णय हे ॲप निर्माण करण्यात आले आहे. हे ॲप सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावयाचे आहे. ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाचा सारांश किमान २ मिनिटांपासून ते जास्तीत जास्त १५ मिनिटाच्या कालावधीत ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करावयाचा आहे. त्यानंतर तो सदरील ॲपवर अपलोड करावयाचा आहे.
गटविकास अधिकारी करणार पडताळणी...
तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसभा झाली की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ते अपलोड केलेले व्हिडिओ पाहून पुढील कार्यवाही करणार आहेत.
ग्रामसेवकांनी ॲपचा वापर करावा...
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत आता प्रत्येक ग्रामसभेतील कामकाजाची माहिती ही जीएस निर्णय ॲपद्वारे नोंदवायची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता येईल. ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती सहजरित्या उपलब्ध होईल. ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.