घरात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा; मराठीच्या पेपरनंतर केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:19 AM2022-03-16T06:19:00+5:302022-03-16T06:19:08+5:30
चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव हे काही महिन्यांपासून आजारी होते.
चापोली (जि. लातूर) : मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. मात्र, अशातच वडिलांचे पहाटे हृदयविकाराने निधन झाले. पहिलाच पेपर असताना ही दुर्दैवी घटना येथील सूरजच्या बाबतीत घडली; परंतु घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने पेपर देण्याचा निर्णय घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांना गलबलून आले.
चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव हे काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. सूरज दहावीचा मंगळवारी मराठीचा पेपर होता. त्याला नातेवाइकांनी परीक्षेला जाण्यासाठी तयार केले. तो परीक्षेहून आल्यानंतरच तातेराव भालेराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सूरजने सकाळी ११ ते २ या वेळेत मराठीचा पेपर सोडविला. त्यानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले.