लातुरात दंगल सुरु असल्याचे सांगत शेतकऱ्यास लुबाडले, प्रतिकार करताच गाडी सोडून चोरटे फरार
By राजकुमार जोंधळे | Published: September 7, 2022 01:20 PM2022-09-07T13:20:39+5:302022-09-07T13:21:09+5:30
महापूर शिवारातील घटने प्रकरणी रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल्र करण्यात आला आहे
लातूर : शहरात दंगल सुरु आहे, अशी बतावणी करुन महापूर शिवारात एका शेतकऱ्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान, शेतकऱ्याने दुचाकी पकडून ठेवल्याने अखेर लुटारू दुचाकी जाग्यावरच टाकून पळून गेले. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नागुराव विठ्ठलराव ढमाले ( वय ६३, रा. महापूर ता. लातूर) हे सायंकाळच्या सुमारास हातात म्हशीचे वासरु घेऊन त्यास बांधण्यासाठी थांबले असता, दुचाकीवरून त्यांच्यासमोर दोघे अनोळखी व्यक्ती असले आणि म्हणाले तिकडे लातूर शहरात दंगल सुरु आहे. तुमच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ठेवा. असा सल्ला त्यांनी दिला. दुसऱ्या दुचकीवरून दोघे तेथे दाखल झाले. त्यांनीही तोच सल्ला दिला. या बोलण्यावर विश्वास ठेवत शेतकरी ढमाले यांनी बोटातील अंगठी काढून खिशात ठेवत असताना एकाने त्यांच्या हातातील अंगठी हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांनी दुचाकी पाठीमागून पकडून ठेवली. त्यामुळे ती दुचाकी तिथेच टाकून दुसऱ्या दुचाकीवरून तिघे पळून गेले. तर चौथा लुटारु हा त्यांच्या दुचाकीच्या मागे पळत गेला. घटनास्थळी पडलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून लुटारूचा शोध घेतला जात आहे.