ठाण्यातून पळालेल्या पॉक्साेतील फरार आरोपीस उस्मानाबादमधून उचलले..!
By राजकुमार जोंधळे | Published: December 21, 2022 05:21 PM2022-12-21T17:21:11+5:302022-12-21T17:21:38+5:30
न्यायालयाने आरोपीला सुनावली न्यायालयीन काेठडी
लातूर : शहरातील उद्याेग भवन परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, विनयभंग करणाऱ्या फरार आराेपीला लातूर पाेलिसांनी उस्मानाबादमधून उचलले आहे. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, पॉक्सो प्रकरणात ताब्यात घेतलेला आराेपी ठाण्यातील पाेलिसांना चकवा देत पळून गेल्याची घटना लातुरात तीन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात घडली हाेती. लातुरातील उद्याेग भवन परिसरात शिकवणीला जात असलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ डिसेंबर राेजी घडली हाेती. दरम्यान, पीडित मुलीने शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली हाेती. तक्रार दाखल हाेताच यातील आराेपी ओमकार उमाकांत कसबे (वय २०, रा. गांधीनगर, लातूर) याच्याविराेधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्साे) गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी दाेन दिवस आधीच शिवाजीनगर पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेत ठाण्यात बसवून ठेवले हाेते. मात्र, पाेलिसांच्या हातावर तुरी देत त्याने ठाण्यातूनच धूम ठाेकली. त्याच्या अटकेसाठी पाेलिसांचे पथक मागावर हाेते. ताे उस्मानाबाद येथे असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पळून गेलेल्या आराेपीच्या मुसक्या पाेलिस पथकाने उस्मानाबाद येथे आवळल्या असून, साेमवारी पाेलिस ठाण्यात हजर केले. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.