आईचं 'खाकी वर्दीचं' स्वप्न लेकीने पूर्ण केलं; मेहनतीने PSI पदी निवड, वडिलांनी गावभर वाटले पेढे
By हरी मोकाशे | Published: July 17, 2023 05:22 PM2023-07-17T17:22:29+5:302023-07-17T17:23:13+5:30
पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी; मेहनतीच्या जोरावर शितल चिल्लेने केली आईची स्वप्नपूर्ती
- महेबूब बक्षी
औसा : लहानपणापासून आईचे पोलिस होण्याचे स्वप्न होते. पण, ती सातवीत असताना पितृछत्र हरवले. त्यामुळे तिचे स्वप्न अधुरे राहिले. आईचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटीने अभ्यास करुन शितल चिल्ले हिने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेत यश मिळविले आहे. आईची लेकीने स्वप्नपूर्ती केल्याने कुटुंबासह गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
औसा तालुक्यातील लामजना येथील शितल राजकुमार चिल्ले हिच्या कुटुंबांत आई- वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. वडिल सोसायटीचे सचिव आहे तर आई घरकाम करते. शितलचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर उच्च माध्यमिकचे शिक्षण औश्यातील कुमारस्वामी महाविद्यालयात झाले. तद्नंतर मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत सन २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अगदी पहिल्याच प्रयत्नात ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत यशस्वी झाली. विशेष म्हणजे, एमपीएस परीक्षेत यश मिळविणारी ती गावातील पहिलीच मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी ढोल -ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून तिचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला.
मला पोलिस अधीक्षक व्हायचेय...
३० वर्षांपूर्वी माझे आजोबा आईला पोलिस म्हणायचे. त्यामुळे आईनेही तेच स्वप्न पाहिले. परंतु, आजोबांच्या अकाली निधनाने ते शक्य झाले नाही. दरम्यान, मी मुलगी असतानाही आई- वडिलांकडून मिळालेल्या खंबीर साथीमुळे हे यश मिळविता आले. त्यातून आईची स्वप्नपूर्ती झाली. मी याच पदावर थांबणार नसून पुढे परीक्षा देणार आहे. पोलिस अधिक्षक होण्याची इच्छा आहे.
- शितल चिल्ले.
मुलगा म्हणूनच शिकविलो...
जग कितीही पुढे गेले असले तरीही आजही काही रुढी- परंपरा आहेत. बाहेरील वातावरण पाहता मुलीस पूर्णपणे स्वतंत्र देणे अशक्य आहे. पण आम्ही शितलला मुलगा समजून शिक्षण दिले. तिने या संधीचे सोने करीत आपले आयुष्य सफल केले आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.
- राजकुमार चिल्ले, वडील.