शासकीय दूध भुकटी प्रकल्प निघणार भंगारात ! एकेकाळी उदगीरचे होते वैभव

By संदीप शिंदे | Published: July 28, 2023 05:37 PM2023-07-28T17:37:57+5:302023-07-28T17:39:16+5:30

शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू

The government milk powder project will be scrapped! Once upon a time Udgir was glorious | शासकीय दूध भुकटी प्रकल्प निघणार भंगारात ! एकेकाळी उदगीरचे होते वैभव

शासकीय दूध भुकटी प्रकल्प निघणार भंगारात ! एकेकाळी उदगीरचे होते वैभव

googlenewsNext

उदगीर : एकेकाळी तालुक्याचे वैभव असलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता शेवटच्या घटका मोजत आहे. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून बंद असून, शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शासनाने मान्यता दिल्यानंतर काही दिवसांत निविदा निघणार असून, प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मागील १४ वर्षांत हालचाल न झाल्याने ही वेळ आली आहे. दरम्यान, प्रकल्पाची मोकळी जागा महत्त्वाची ठरणारी आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. दि. १९ जानेवारी १९७९मध्ये तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणाने तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत चालूच झाला नाही. नव्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी समितीने १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर कारवाईच झाली नाही.

दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा , कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशातील अनेक भागांत विकले जात होते. यातून राज्य शासनास चांगले उत्पन्न मिळत होते. त्याकाळात ५३५ कर्मचारी काम करत होते. शासनाने १३ एकर जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. तब्बल २४ वर्षे उत्तम प्रकारे चालला. २००२ ते २००८ या काळात हा प्रकल्प बंद पडलेला होता. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ५९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. डिसेंबर २०१४ ते ७ ऑगस्ट २०१५ पर्यंत दूध भुकटी प्रकल्प सुरू होता. मात्र, ऑगस्ट २०१५ नंतर बॉयलरमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे तो बंद झाला तो आजपर्यंत बंदच आहे.

प्रकल्पातील मशिनरीचे कंपनीकडून मुल्यांकन...
सुरुवातीला या प्रकल्पात पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी आज केवळ आठ कर्मचारी कामावर आहेत. आता हा प्रकल्प बंदच आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीमार्फत या मशिनरीचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्याची माहिती माहीती शासनाकडे पाठविण्यात आली असल्याचे उदगीर येथील प्रभारी दुग्धशाळा उपव्यवस्थापक नितीन फावडे यांनी सांगितले. यानंतर पुढील कारवाई काय होणार याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The government milk powder project will be scrapped! Once upon a time Udgir was glorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.