शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावणार; शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघाने आखला विशेष उपक्रम
By संदीप शिंदे | Published: September 29, 2023 04:42 PM2023-09-29T16:42:16+5:302023-09-29T16:43:05+5:30
माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावण्यासाठी सराव परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख उंचावणार असून, माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या सराव परीक्षेस आठ हजार विद्यार्थी सामोरे जाणार असून, विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती या उपक्रमामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यासाठी ४ ऑक्टोबर रोजी सराव परीक्षा होणार असून, जिल्हा परिषद खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहित शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. ही परीक्षा मोफत असून, ओएमआर उत्तरपत्रिका असल्याने परीक्षा झाल्यावर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून, प्रश्नपत्रिका वितरणासाठी तालुकास्तरावर सोय करण्यात आली आहे.
लातूर, रेणापूरसाठी मुख्याध्यापक भवन राजीव गांधी चौक लातूर, औशासाठी मुक्तेश्वर विद्यालय, उदगीर, जळकोट, देवणीसाठी राजर्षी शाहू विद्यालय उदगीर तर निलंगासाठी प्राचार्य अजय मोरे, शिरूर अनंतपाळसाठी मन्मथ स्वामी विद्यालय शिरूर अनंतपाळ, अहमदपूरसाठी नूतन मराठी विद्यालय तर चाकूरसाठी इंदिरा पाटील विद्यालयात प्रश्नसंच मिळणार आहेत. शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बी.जी. चोले, कालिदास शेळके, गोविंद बागड, रमेश मदरसे, दत्तात्रय पारवे, अनिल कारभारी, शिवराज म्हेत्रे, रामेश्वर कदम, एस.व्ही. मादलापुरे, विशाल पात्रे, परवेज पठाण आदींसह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
गुणवत्ता वाढीला चालना मिळणार...
माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावण्यासाठी सराव परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात मोफत सराव परीक्षा वितरित होणार असून, आठ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विविध सराव परीक्षा घेण्याचे नियोजन असून, शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत असल्याचे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितले.