गुप्तधनाच्या लालसेपाेटी लामजन्यात खाेदला खड्डा; वनविभाग, पोलिस, महसूल विभागांकडून पंचनामा
By राजकुमार जोंधळे | Updated: July 13, 2024 21:28 IST2024-07-13T21:27:49+5:302024-07-13T21:28:13+5:30
पाेलिसांनी सांगितले, किल्लारी भूकंपानंतर लामजना गावाचे पुनर्वसन झाल्याने जुने गाव ओस पडले आहे.

गुप्तधनाच्या लालसेपाेटी लामजन्यात खाेदला खड्डा; वनविभाग, पोलिस, महसूल विभागांकडून पंचनामा
किल्लारी (जि. लातूर) : गुप्तधनाच्या लालसेतून जुन्या लामजना (ता. औसा) गावात खड्डा खाेदल्याची माहिती समाेर आली. अफवा पसरल्याने बुजवलेला खड्डा पुन्हा उकरण्यात आला. मात्र, काहीही आढळून आले नाही. घटनास्थळी वनविभाग, पाेलिस, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, किल्लारी भूकंपानंतर लामजना गावाचे पुनर्वसन झाल्याने जुने गाव ओस पडले आहे. सध्याला ही जागा वनीकरण विभागाकडे हस्तांतरित केलेली आहे. जुन्या गावात गुप्तधनाच्या लालसेतून खड्डा खाेदण्यात आल्याची चर्चा गावात पसरली. नागरिकांतून तर्कवितर्क लढविले जात हाेते. काही दिवसांपूर्वी गोटेवाडीत दोन महिलांची हत्या करून गाडल्याची घटना घडली हाेती. असाच काहीसा प्रकार घडला काय? असा संशय नागरिकांमध्ये बळावला. कोणाची हत्या करून गाडले तर नाही ना? अशी कुजबुज सुरू झाली. घटनास्थळी शासकीय यंत्रणा दाखल झाली अन् खड्डा पुन्हा उकरण्यात आला. खड्डा पाच फूट खाेल, चार फूट रुंद आणि सहा फूट लांबीचा आहे. दिवसभर ताे खड्डा उकरण्यात आला मात्र, काहीही आढळले नाही.
घटनास्थळी पहिल्यांदा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. पाहणी केल्यानंतर याबाबत किल्लारी येथील सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे यांना दिली. त्यांनी पाेउपनि. अशोक ढोणे, आबा इगळे यांना तातडीने पाठविले. तर महसूल विभागाचे मंडळाधिकारी, तलाठी, वनविभागाचे कर्मचारीही दाखल झाले. हा खड्डा गुरुवारी खाेदण्यात आल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जुन्या गावामध्ये गुप्तधनाची अफवा... -
भूकंपानंतर किल्लारी परिसरातील गावांचे पुनर्वसन झाले असून, आजही जुन्या गावातील ढिगाऱ्याखाली गुप्तधन असल्याची अफवा आहे. अंधश्रद्धेतूनच काही जण जुन्या गावात खड्डा खाेदण्याचा प्रयत्न करत आहेत. खड्डा खाेदूनही हाती काही नाही लागल्याने ताे खड्डा पुन्हा बुजविण्यात आला असावा, असा अंदाज किल्लारी पाेलिसांनी व्यक्त केला आहे.