मोठा दिलासा! दमदार पावसाने लातूर जिल्ह्याचा भू-जलस्तर १.३५ मीटरने वाढला
By संदीप शिंदे | Published: October 20, 2022 06:35 PM2022-10-20T18:35:59+5:302022-10-20T18:37:25+5:30
चांगला पाऊस असल्याने भूजल पातळीत वाढ
लातूर : मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस झाला असल्याने लघु, मध्यम प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची पाणीपातळी १.३५ मीटरे वाढली आहे.
जूनच्या सुरुवातीला उशिरा पाऊस झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात तर ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. आता ऑक्टोबर महिना सुरू असला तरी मागील चार दिवसांपूर्वी औराद, निलंगा, औसा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही महसूल मंडळांत तर अतिवृष्टीही झालेली आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले प्रवाहित झाले होते. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले असून, ऑक्टोबर महिन्यात पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत १.३५ मीटरने वाढ झाली असून, ही दिलासादायक बाब आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पोषक ठरला असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
तालुकानिहाय पाणीपातळीतील वाढ
मागील पाच वर्षांच्या तुलनेत अहमदपूर तालुक्यात १.६१ मीटर, औसा २.१२, चाकूर १.१२, लातूर २.५०, निलंगा १.१८, शिरूर अनंतपाळ ०.२१, रेणापूर १.०१, उदगीर १.३२, जळकोट २.०६, देवणी ०.३५ अशी एकूण सरासरी १.३५ मीटरने पाणीपातळी वाढली असल्याचे समोर आले आहे.
प्रत्येकी तीन महिन्यांनी नोंद...
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यांतील निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणीपातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण नोंदीतून भूजलस्तर १.७९ मीटरने वर आल्याचे समोर आले आहे.
जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा...
जिल्ह्यात मागील आणि यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १.३५ मीटरने पाणीपातळी वाढलेली आहे. पाणीपातळी वाढली असली तरी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे आवश्यक आहे. जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- एस. बी. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक लातूर