गावागावांतील काट्याकुट्याची मैदाने होणार आता विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणे
By हरी मोकाशे | Published: July 12, 2024 07:30 PM2024-07-12T19:30:20+5:302024-07-12T19:30:48+5:30
जिल्हा परिषद शाळांतील मुलांना खेळण्यासाठी दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
लातूर : बहुतांश खाजगी शाळांना मैदान नसल्यामुळे खेळासाठी विद्यार्थ्यांची सातत्याने कसोटी लागते, तर जिल्हा परिषद शाळांना मैदान असले तरी त्यावरील काट्याकुट्यामुळे खेळाडूंची तारांबळ होते. जिल्हा परिषद शाळांतील मुलांना खेळण्यासाठी दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. मग्रारोहयोअंतर्गत पहिल्या टप्प्यात ९९ क्रीडांगणे निर्माण करण्यात येणार आहेत.
शिक्षणाबरोबर आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मुलांनी किमान दररोज तासभर मैदानी खेळ खेळले पाहिजे, म्हणून शासनाने प्रत्येक शाळांना क्रीडांगण बंधनकारक केले आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे बहुतांश शाळांना क्रीडांगणाची वाणवा निर्माण झाली आहे. परिणामी, शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या तासिकाही वर्गातच होत असल्याचे पहावयास मिळते. याउलट ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना पुरेसेे मैदान आहे. मात्र, तिथे काटेरी गवत-झुडुपे उगवतात. त्यातच काहीजण कचरा टाकतात तर विघ्नसंतोषी नासधूस करतात. त्यामुळे शाळेतील मुलांना मैदानी खेळ खेळण्यास अडसर निर्माण होत आहे. ही समस्या दूर व्हावी म्हणून शासनाने मग्रारोहयोअंतर्गत शाळा परिसरात क्रीडांगणे निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात ९९ खेळाची मैदाने...
तालुका - क्रीडांगण
अहमदपूर - १४
औसा - १५
चाकूर - ०९
देवणी - ०७
जळकोट - ०७
लातूर - १३
निलंगा - १३
रेणापूर - ०८
शिरुर अनं. - ०४
उदगीर - ०९
एकूण - ९९
एका क्रीडांगणासाठी साडेचार लाखांचा निधी...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या क्रीडांगणासाठी प्रत्येकी ४ लाख ६६ हजार रुपये उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक क्रीडांगण १० हजार स्के. फुटाचे असणे बंधनकारक आहे. दीड फुट खोदकाम करुन त्यात प्रारंभी दगड टाकण्यात येणार आहेत. त्यानंतर मुरुम भरुन त्यावर लाल माती टाकली जाणार आहे. क्रीडांगणासाठी तांत्रिक मान्यता जिल्हा क्रीडा अधिकारी तर प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी देणार आहेत.
सीईओंच्या संकल्पनेतून होणार खेळाची मैदाने...
जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून खेलो लातूर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातनू फुटबॉल, व्हॉलिबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो यासारख्या अन्य खेळांसाठी क्रीडांगण साकारण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली वृक्ष लागवड केली जाणार आहे.
३४ मैदान निर्मितीस प्रशासकीय मान्यता...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७६ शाळा आहेत. मग्रारोहयोअंतर्गत पहिल्या टप्प्यात ९९ शाळांच्या परिसरात क्रीडांगण निर्माण करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी ९३ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यातील ५६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ३४ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मुलांचा शारीरिक, मानसिक विकास...
ग्रामीण भागातील मुलांना क्रीडा सोयी- सुविधा मिळत नसल्याने त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास अडसर निर्माण होतो. त्यामुळे मग्रारोहयोअंतर्गत प्रयोगिक तत्त्वावर ९९ ठिकाणी क्रीडांगण निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे. शिवाय, चांगले खेळाडू तयार होतील. जिल्हा नियोजन समितीतून क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.