उष्णता वाढली, स्वतःला सांभाळा; लातुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर
By हरी मोकाशे | Published: April 19, 2023 07:09 PM2023-04-19T19:09:12+5:302023-04-19T19:10:12+5:30
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला आहे.
औराद शहाजानी : रविराजा दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढत आहे. बुधवारी कमाल तापमान ४३ अं.से. वर पोहोचले तर बाष्पीभवनाचा दर उच्चांकी स्तरावर जाऊन ८.६ मिलीमीटर इतका झाला झाल्याची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. परिणामी, धरण क्षेत्रातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या चार दिवसांत वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही- लाही होत आहे. बुधवारी कमाल तापमान ४३ अं.से. वर पोहोचले तर किमान तापमान २७ अं.से. वर राहिले. वाढत्या उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पहावयास मिळाले. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, पांढऱ्या रुमालाचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. शिवाय, थंड पेयांसह टरबूज, खरबूज, द्राक्ष आदी फळांना मागणी वाढली आहे.
बंधाऱ्यातील जलसाठाही घटला...
वाढत्या तापमानामुळे नदीवरील तगरखेडा बंधाऱ्या २० टक्के, औराद- ३२ टक्के, वांजरखेडा- ०, गुजंरगा- १५ टक्के, मदनसुरी- ५ टक्के तर हंगरगा साठवण तलावात २४ टक्के, हनुमंतवाडी तलावात २२ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसिंचनचे शाखा अधिकारी दत्ता काेल्हे यांनी सांगितले.
औराद हवामान केंद्रावरील नाेंदी...
तारीख कमाल किमान बाष्पीभवन
१९ एप्रिल ४३.० २७.० ८.६
१८ एप्रिल ४२.५ २६.५ ८.४
१७ एप्रिल ४३.५ २९.५ ८.५
१६ एप्रिल ४०.० २८.० ८.०