तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

By हरी मोकाशे | Published: June 15, 2023 06:37 PM2023-06-15T18:37:15+5:302023-06-15T18:39:17+5:30

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

The intense heat caused the storage pond to collapse and a giant crocodile came out | तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

googlenewsNext

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : उदगीर तालुक्यातील हाळी गावानजीकच्या खरबवाडी येथील साठवण तलावात जवळपास एक क्विंटल वजनाची, आठ फुट लांबीची मगर बुधवारी काही शेतकऱ्यांना आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीस जेरबंद करुन सुरक्षित स्थळी सोडले.

उदगीर तालुक्यातील खरबवाडी व भाकरवाडी शिवारात साठवण तलाव आहे. या तलावातून खरबवाडीस पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी या तलाव परिसरात एक मगर असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी वनविभागाला कळविले की होते. मात्र, पाणी जास्त असल्याने मगर सापडली नव्हती. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील जलसाठा आटत आहे.

सध्या तलावात पाण्याचे डबके शिल्लक राहिले आहे. त्यामुळे बुधवारी मगर पाण्याबाहेर पडली. ती तलावाच्या सांडव्यात ओलसर थंड जागेवर असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी एकाच गर्दी केली. दरम्यान, उपसरपंच प्रवीण जगताप यांनी वनविभागास याची माहिती दिली. उदगीरचे वनपरिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे, चाकूर येथील वनपरिमंडळ अधिकारी सुरेश मस्के, वनरक्षक बी.एच. गडकर, विश्वनाथ होनराव यांनी मगरीला पकडून सुरक्षितस्थळी सोडले. दरम्यान, या साठवण तलावातील शिल्लक पाण्यात आणखी एक मगर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

तलाव परिसरात आणखी एक मगर असल्याची चर्चा आहे. साठवण तलावा अंतर्गत खरबवाडीस पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीचे व तलावातील शिल्लक पाणी लवकरच काढले जाणार आहे.
- प्रवीण जगताप, उपसरपंच, खरबवाडी

Web Title: The intense heat caused the storage pond to collapse and a giant crocodile came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.