उन्हाची तीव्रता वाढली, औराद शहाजानीचा पारा पोहोचला ४० अंशावर
By हरी मोकाशे | Published: March 29, 2023 07:08 PM2023-03-29T19:08:47+5:302023-03-29T19:09:35+5:30
बाष्पीभवन वाढल्याने विविध सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा घटला आहे
औराद शहाजानी : यंदा मार्चमध्येच उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी औराद शहाजनी येथील हवामान केंद्रावर कमाल तापमान ४०.५ अं. से. असे नोंदले गेले आहे. वाढत्या तापमानाने बाष्पीभवन वाढले असून नद्यावरील धरण क्षेत्रातील पाणीसाठा ७० टक्क्यांनी घटला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वच साठवण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला. यंदा उन्हाळा अधिक कडक जाणवू लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यातही थंडीचा कालावधी अत्यल्प राहिला. त्यामुळे यंदा हिवाळ्यातही बाष्पीभवनाचा वेग जास्त राहिला. शिवाय, शेतीसाठी पाणीउपसा वाढला आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता फेब्रुवारी, मार्चपासून वाढत असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
दिनांक कमाल किमान बाष्पीभवन
२९ मार्च ४०.५ २३.० ६.०
२८ मार्च ३८.० २२.० ५.४
२७ मार्च ३७.५ २०.० ४.८
२६ मार्च ३७.० २०.० ४.८
जलसाठा घटला...
सिंचनासाठी पाणी उपसा वाढला आहे. तसेच बाष्पीभवनामुळे तेरणा नदीवरील उच्चस्तरीय बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला असल्याचे जलसिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. आर. मुळे यांनी सांगितले.
बंधारा पाणीसाठा
औराद- ३७.९९ टक्के
तगरखेडा- २६.५५ टक्के
वांजरखेडा- २० टक्के
गुजंरगा- २४.९० टक्के
मदनसुरी- ८.८७ टक्के
लिंबाळा- २० टक्के.