भूगर्भातून आवाजाचा होणार उलगडा; हासाेरी गावात नवी दिल्ली, नागपूरचे पथक भेट देणार !
By राजकुमार जोंधळे | Published: September 13, 2022 07:27 PM2022-09-13T19:27:04+5:302022-09-13T19:27:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची भेट, नागरिकांनी भूगर्भातून आवाजाने घाबरु नये
लातूर : निलंगा तालुक्यातील हासाेरीसह गावात गत आठ दिवसांपासून भूगर्भातून आवाज येण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांत घबराहटीचे वातावरण आहे. या आवाजाच्या अभ्यासाठी नागपूर येथील भारतीय भू-विज्ञान संस्था आणि नवी दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभागाचे पथक हासाेरी गावात दाखल हाेणार आहे. नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मंगळवारी गावाकऱ्यांशी संवाद साधताना केले.
हासोरी गावात गत सहा तारखेपासून भूकंपसदृश्य आवाज आणि धक्के जाणवत असल्याची नागरिकांनी महिती दिली. याबाबत ९ सप्टेंबररोजी प्रभारी अधिकारी भूकंप वेधशाळा हवामानशास्त्र विभाग, लातूर आणि वरिष्ठ व वैज्ञानिक पूजन सर्वेक्षण विभाग लातूर यांनी हासाेरी गावाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, भारतीय हवामान खात्याचे भूकंप वेधशाळा लातूर येथे भूकंपाची नोंद झाली नाही. याबाबत अतिरिक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यासाठी नागपूर येथील भारतीय भु-विज्ञान संस्था आणि नवी दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे भूकंपशास्त्र विभागाचे पथकाशी जिल्हाधिकारी यांनी पत्रव्यवहार केला आहे. दिल्ली आणि नागपूर येथील तज्ज्ञांचे पथक हासोरी गावाला भेट देणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोडवे, वरिष्ठ वैज्ञानिक एस.बी. गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, सहाय्यक भूवैज्ञानिक जि. प. लातूरचे प्रदीप नागरगोजे आदी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा...
गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्यानुसार विविध पथके स्थापन करणे, प्रशिक्षण देणे, शिवाय सुरक्षित स्थानांची निश्चिती करणे, धोकादायक इमारती, धोकादायक स्थळाची पाहणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. १४ सप्टेंबररोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भूगर्भशास्त्र विभागातील तज्ज्ञ, निलंगा येथील प्राध्यापकांचे पथक हासोरीत भेट देणार असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.