मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

By राजकुमार जोंधळे | Published: September 3, 2022 02:26 PM2022-09-03T14:26:33+5:302022-09-03T14:28:24+5:30

जात पंचायतच्या पंचांनी दिले शंभरच्या बॉण्डवर शपथपत्र; पोलीस आणि अंनिसच्या प्रबोधनाला आले यश

The Jat Panchayat was dissolved by the Bhoi community of Latur | मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

Next

लातूर : शहरातील भोई समाजाने घेलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने बदल घडविला आहे. यापुढे जातपंचायतच अस्तित्वात राहणार नाही. शिवाय, वाद-विवाद आणि भांडण-तंटा हा सनदशीर, कयद्याच्या चौकटीत राहून सोडविला जाणार आहे, असे शनिवारी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे शंभर रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करत बरखस्तीचा पुरोगामी निर्णय जाहीर केला आहे. पोलीस व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या प्रबोधनाला यश आले आहे. लातुरातील भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचायतच्या माध्यमातून न्याय निवडा केला जात होता. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर कायदा अस्तित्वात असतानाही जात पंचयतीतच न्याय निवडा केला जात होता. दोन्ही वादी-प्रतिवादी बाजूच्या पंचाच्या सहमतीने निवाडा केला जात होता.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका प्रकरणात जातपंचयतीच्या पंचावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे यांनी संपर्क साधला. जातपंचयत आणि कायदेशीर बाजू याबवत त्यांनी सतत प्रबोधन केले. यातून आपण करत असलेले काम हे बेकायदेशीर असल्याची जाणीव पंचाना झाली. समाजातील पंचाची एक व्यापक बैठक झाली. याच बैठकीत भोई समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

याबाबतचा निर्णय समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना १०० रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करण्यात आले आहे. यावर समाजातील नागनाथ गवते, सुग्रीव गवते, बालाजी गवळी, दत्ता गवळी,तुकाराम मोरे, दिगंबर मोरे, सचिन गवळी, लक्ष्मण मोरे, लखन काजळे, सहदेव मोरे, देविदास खरटमल, योगेश गवळी, कृष्णा घेणे, अशोक मोरे आदींसह ७६ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

यांनी घेतला पुढाकार...
भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचयतीच्या माध्यमातून होणारा न्याय निवडा हा बेकायदेशीर आहे. यातून समाजातील व्यक्तीला बहिष्कृत करणे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करणे असे प्रकार घडतात. यातूनच न्याय मागणाऱ्याचा छळ होतो. हे रोखण्यासाठी अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पुढाकार घेत समाजात हा बदल घडविला आहे.

Web Title: The Jat Panchayat was dissolved by the Bhoi community of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.