सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाच्या आदेशाने लातूरात शिक्षण विभाग गोंधळात !
By हरी मोकाशे | Published: June 10, 2023 07:03 PM2023-06-10T19:03:44+5:302023-06-10T19:03:47+5:30
दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे म्हटले आहे.
लातूर : समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यंदापासून मोफत गणवेशाचा लाभ देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, निधी केवळ सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागच गोंधळात पडला आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत एका गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश दिले जातात. गणवेशासाठीचा निधी शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करून दिला जातो.
राज्यांतील सर्व शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. स्काऊट व गाईडशी अनुरूप एकसमान रंगाचा दर्जेदार गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अथवा पॅन्ट. तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट. तसेच ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तिथे सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाचा असणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नवीन आदेश काढत नवीन शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणेश योजनेचा लाभ देण्यासाठी पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.
'सर्व'चा अर्थ अधिकाऱ्यांनाही कळेना...
दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. पुढे पात्र विद्यार्थी असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारीही संभ्रमात पडले असल्याचे दिसून येत आहे.
निधी जुन्याच आदेशाप्रमाणे उपलब्ध...
गेल्यावर्षी या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ८५ हजार ७२६ विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशाकरिता २ कोटी ५७ लाख १७ हजार ८०० रुपये शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेणार...
शासन निर्णयात सर्व विद्यार्थ्यांना असा शब्द असला तरी मोफत गणवेशासाठी गेल्यावर्षी प्रमाणेच निधी उपलब्ध झाला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून माहिती घेतली जाणार आहे.
- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.