ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

By संदीप शिंदे | Published: August 21, 2023 04:48 PM2023-08-21T16:48:34+5:302023-08-21T16:48:51+5:30

ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे

The lowest rainfall in the decade in August! Crops failed due to lack of water | ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

googlenewsNext

औराद शहाजानी (जि.लातूर) : अल निनोचा परिणाम जून व ऑगस्ट महिन्यातील पावसावर झाला असून, या महिन्यात आतापर्यंत केवळ २८.८ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील दहा वर्षांत सर्वांत कमी पावसाची ऑगस्टमध्ये नोंद झाली असून, पाण्याच्या कमतरतेमुळे शेतशिवारातील सोयाबीनची फुलगळ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतमालाचा उतारा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी मंडळामध्ये यावर्षी खरीप हंगामात ४२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, सुरुवातील पावसाने खंड दिल्यावर जुलैमध्ये पाऊस झाल्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. केवळ रिमझिम पाऊस असल्याने त्यावरच पिकांनी तग धरली आहे. मात्र, मागील २९ जुलैपासून परिसरात पाऊस नसल्याने पिकांची फुलगळ सुरू झाली आहे. पिकाची वाढ खुंटली असून, फुलगळ होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. दरम्यान, वरून पिके हिरवीगार दिसत असली तरी आतून निस्तेज झाली आहेत. परिणामी, यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला असल्याचे शेतकरी नागेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच, ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे, असे औराद शहाजानी कृषी मंडळ अधिकारी रणजित राठोड यांनी सांगितले.

बाजारात शेतमालाची आवक घटली...
मागील वर्षी सोयाबीनचा उतारा घटला होता. त्यामुळे बाजारात आवक कमीच होती. आता सुद्धा शेतमालाची आवक अत्यल्प असून, पावसाचा खंड असल्याने सोयाबीनचा उतारा घटणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातही आवक जेमतेम राहील असे, आडत व्यापारी सतीश देवणे यांनी सांगितले.
मागील पाच वर्षांतील ऑगस्टच्या नाेंदी...
२०२३ - २८.८ मि.मी., २०२२-११७ मि.मी., २०२१- १८८ मि.मी., २०२०- १०९ मि.मी., २०१९- २२७.८ मि.मी., २०१८-१२९.६ मि.मी., २०१७- ३१६ मि.मी, २०१६-६३.४ मि.मी. पाऊस झाला आहे. १९७२ मध्ये पूर्ण वर्षभरात केवळ १०९ मि.मी. पाऊस झाला होता. तर, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात केवळ २८.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

Web Title: The lowest rainfall in the decade in August! Crops failed due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.