किमान तापमान उतरले; थंडीचा कडाका वाढला
By हरी मोकाशे | Published: January 25, 2024 08:05 PM2024-01-25T20:05:54+5:302024-01-25T20:06:17+5:30
दोन महिन्यांतील निच्चांकी तापमान
लातूर : उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे किमान तापमानात घसरण होत गुरुवारी १०.२ अं. से. पर्यंत पारा खाली उतरला. त्यामुळे थंडी अधिक प्रमाणात जाणवत आहे. थंडीपासून बचाव करणाऱ्यासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत असल्याचे पाहावयास मिळाले.
यंदाच्या हिवाळ्यात थंडी जाणवत असली तरी दरवर्षीप्रमाणे ती अधिक प्रमाणात जास्त दिवस जाणवली नाही. परिणामी, किमान तापमानातही गेल्या वर्षीच्या तुलनेत फारशी घट झाली नाही. १५ डिसेंबरला किमान तापमान १०.३ अं. से. लातूरच्या गळीत धान्य संशोधन केंद्रात नोंदले गेले होते. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होऊन १५ अं. से.च्या जवळपास राहिले. मात्र, गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, किमान तापमान पुन्हा उतरले आहे. विशेषत: डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील सर्वात नीचांकी तापमान शनिवारनंतर गुरुवारी नोंदले गेले आहे.
पारा १०.२ अं. से. पर्यंत उतरला...
दिनांक - किमान - कमाल
१७ जाने. - १५.९ - २५.८
१८ रोजी - १०.८ - २५.२
१९ रोजी - १०.६ - ३०.२
२० रोजी - १०.२ - २१.०
२१ रोजी - १०.४ - २५.६
२२ रोजी - १०.८ - २५.४
२३ रोजी - १५.५ - ३०.०
२४ रोजी - १५.४ - ३०.२
२५ रोजी - १०.२ - २५.३
नवजात बालकांची काळजी घ्यावी...
वातावरणातील बदलामुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे नवजात बालकांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच काही दिवसांपासून बालकांमध्ये गालफुगीचा आजार आहे. मात्र, तो गंभीर नाही. गालफुगीची लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. शिवप्रसाद मुंदडा, बालरोग विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.