दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील अल्पवयीन आरोपी जाळ्यात, दुचाकीसह मोबाईल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: November 21, 2022 08:20 PM2022-11-21T20:20:29+5:302022-11-21T20:21:42+5:30
दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लातूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील दोघा अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दुचाकी आणि मोबाईल चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास विवेकानंद चौक ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर करत होती. माहितीनुसार, दोघा अल्पवयीन मुलांना (वय १५) संशयास्पद फिरत असताना एलआयीस कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांची अधिक झाडाझडती घेत कसून चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची दुचाकी आणि दोन मोबाईल असा जवळपास ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लातूरसह जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी आणि मोबाईलची चोरी करणारी अल्पवयीन मुलांची टोळी सध्याला सक्रीय आहे. यातील हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अंग रघुनाथ कोतवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, बिलपट्टे, सुरवसे, हासबे, मस्के, पठाण, शेख, पाटील यांच्या पथकाने केली.