बाळंतविड्याने आई ठणठणीत, बाळ गुटगुटीत ! लातूर जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

By हरी मोकाशे | Published: August 2, 2024 07:23 PM2024-08-02T19:23:43+5:302024-08-02T19:24:27+5:30

८७ अंगणवाड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड ही प्रयोगिक तत्त्वावर मोहीम सुरु करण्यात आली.

The mother is stiff, the baby is gurgling by Balantvida! Pilot initiative of Latur Zilla Parishad | बाळंतविड्याने आई ठणठणीत, बाळ गुटगुटीत ! लातूर जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

बाळंतविड्याने आई ठणठणीत, बाळ गुटगुटीत ! लातूर जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

लातूर : आर्थिक अडचण, दैनंदिन कामाच्या व्यापामुळे खेड्यातील गरोदर महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, रक्तक्षयाबरोबर नवजात शिशू कुपोषित जन्मण्याचा धोका अधिक असतो. अशा समस्या उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने गर्भवतींसाठी बाळंतविडा हा उपाय राबविण्यात आला. त्यामुळे आई ठणठणीत होऊन बाळ गुटगुटीत जन्मण्यास मदत झाली आहे. नाविण्यपूर्ण हा उपक्रम राज्यास पथदर्शी ठरणारा आहे.

जिल्ह्यात ७८६ ग्रामपंचायती असून २ हजार ३२४ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ८७ अंगणवाड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड ही प्रयोगिक तत्त्वावर मोहीम सुरु करण्यात आली. याअंतर्गत ६ ते ९ महिने गरोदर असलेल्या महिलांसाठी मार्चमध्ये बाळंतविडा किट वाटप ही नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात आली. योजनेतून दोन हजार गर्भवतींना बाळंतविडा किट देण्यात आले. तसेच विविध पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या पाककृतीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. शिवाय, बनविलेले पदार्थ स्वत: सेवन करीत असल्याचे अंगणवाडी सेविका, कार्यकर्तींच्या माध्यमांतून पडताळणी करण्यात आली.

सुका मेवा, प्रोटिनयुक्त पदार्थ...
बाळंतविडा किटमध्ये गुळ, शेंगदाणे, आळीव, बदाम असा सुका मेवा आणि प्रोटिनयुक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे. हा पौष्टिक आहार एप्रिल, मे, जून असे तीन महिने देण्यात आला. त्यासाठी एक कोटींचा खर्च झाला. दरम्यान, विशेष लक्ष केंद्रित करुन नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली असता महिलांचा हिमोग्लोबीनमध्ये वाढ झाल्याचे आणि नवजात शिशू सुदृढ जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हाभरात राबविणार...
गरोदर महिलांमध्ये रक्तक्षय, बाळांतपणात गुंतागुंत होऊ नये तसेच बाळ सुदृढ जन्मावे म्हणून ही नाविण्यपूर्ण योजना २ हजार गर्भवतींसाठी राबविण्यात आली. पौष्टिक आहारामुळे महिलांमधील हिमोग्लोबीन वाढले. तसेच बाळही गुटगुटीत जन्मले आहे. यंदा हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्याचे नियोजन आहे.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

कुपोषण निर्मूलन...
कुपोषण निर्मूलनासाठी गर्भवतींना पौष्टिक आहार आवश्यक असतो. त्यामुळे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेनुसार बाळंतविडा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तीन महिन्यांच्या संतुलित आहारामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहिले. तसेच कुपोषण निर्मूलनास मोठी मदत झाल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी सांगितले.

Web Title: The mother is stiff, the baby is gurgling by Balantvida! Pilot initiative of Latur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.