हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

By हरी मोकाशे | Published: August 12, 2022 06:20 PM2022-08-12T18:20:05+5:302022-08-12T18:20:51+5:30

किल्लारीत भाविकांची गर्दी : मंदिरापासून ईश्वर डोहापर्यंत निघाली पालखी

The Neelkantheshwar Yatra begins with the chanting of Har Har Mahadev in Killari | हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

googlenewsNext

हरी मोकाशे/ लातूर

किल्लारी (जि. लातूर) : ओम नम: शिवाय, हर हर महादेव, शिव शिव सांब सदाशिवच्या जयघोषात किल्लारीच्या श्री नीळकंठेश्वर मंदिरापासून निघालेली पालखी मिरवणूक परंपरेनुसार ईश्वर डोहावरील शिवलिंग पिंडीस भेट देऊन परतली. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना होऊन श्री नीळकंठेश्वराच्या यात्रेस शुक्रवारी दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर येथील ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर मंदिराच्या यात्रेस प्रारंभ होतो. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन- तीन वर्षे यात्रा भरली नव्हती. त्यानंतर यंदा प्रथम यात्रा भरल्याने भाविकांत आनंद, उत्साह दिसून येत होता. यात्रेनिमित्ताने गावाबरोबरच परिसरातील भाविकांनी शुक्रवारी सकाळपासून दर्शनासाठी रीघ लावली होती. भाविकांनी मनोभावे पूजा करुन दर्शन घेत होते.

सकाळी ९ वा. किल्लारीतील श्री नीळकंठेश्वर मंदिरापासून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. ढोल- ताशा आणि टाळ- मृदंगाच्या गजरात हाती पताका घेऊन ओम नम: शिवाय, हर हर महादेव, शिव शिव सांब सदाशिव असा जयघोष करीत भाविक सहभागी झाले होते. ही पालखी किल्लारी पाटीमार्गे जुन्या गावातील नीळकंठेश्वर मंदिरापासून तीन किमीवर असलेल्या ईश्वर दोड येथील शिवलिंग पिंडीची भेट घेतली. त्यानंतर पालखी श्री नीळकंठेश्वर मंदिरात परतली. त्यानंतर आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते महापूजा, भजन, आरती झाली. तद्नंतर यात्रेस प्रारंभ झाला. जवळपास ८ किमीच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यावेळी सपोनि. सुनील गायकवाड, पीएसआय राजपूत, पीएसआय ढोणे यांच्यासह गौतम भोळे, आबा इंगळे, कृष्णा गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बालकांसाठी मनोरंजनाचे साहित्य...
यात्रेनिमित्ताने येथील मंदिर परिसरात विविध दुकाने सजली आहेत. तसेच बालकांसाठी खेळणीची दुकाने लागली आहेत. पाळणे, ब्रेक डान्स अशी मनोरंजनाची दुकाने सुरु करण्यात आली आहेत.

११ दिवस सुरु राहणार महोत्सव...
पालखीचे स्वागत करण्यासाठी महिलांनी घरासमाेर सडा टाकून रांगोळी काढली होती. पालखी येताच बेल-फुल, श्रीफळ अर्पण करुन भाविकांनी दर्शन घेतले. तसेच या मार्गावरील व्यापाऱ्यांनी पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले. हा यात्रा महोत्सव ११ दिवस सुरु राहणार आहे. या कालावधीत दररोज प्रवचन, भजन, रात्री कीर्तन होणार आहे. तसेच नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, रक्तदान अशा सामाजिक उपक्रमांबरोबर समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: The Neelkantheshwar Yatra begins with the chanting of Har Har Mahadev in Killari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.