पुण्यातील रेल्वेस्थानकात लातूरच्या प्रवाशांचा राडा ! लातुरात मुंबई-बीदर रेल्वे दाेन तास उशिरा पाेहचली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 07:32 PM2022-12-18T19:32:59+5:302022-12-18T19:33:07+5:30
रविवारी ग्राम पंचायतीसाठी मदतन हाेत असल्याने, गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांची पुणे रेल्वेस्थानकावर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
राजकुमार जोंधळे / लातूर : रविवारी ग्राम पंचायतीसाठी मदतन हाेत असल्याने, गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांची पुणे रेल्वेस्थानकावर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली. दरम्यान, रात्री १२.३० वाजता मुंबई-बीदर एक्सप्रेस दाखल झाली. प्रवासी प्रवेश करण्यासाठी धडपडत हाेते. मात्र, रेल्वेचे दरवाजे आतून बंद केल्याने प्रवासी प्रचंड संतपाले. आमच्यासाठी सुरु केलेल्या रेल्वेचे दार बंद हाेते, हे चालणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त लातूरकर प्रवाशांनी पुणे रेल्वेस्थानकावरच एकच गाेंधळ घातला. चक्क रेल्वेरुळावरच प्रवाशांनी आडवे पडून आंदाेलन केले. तब्बल दाेन तास उशिराने ही रेल्वे लातूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
पुणे-मुंबईत कामानिमित्त स्थलांतरील झालेल्या हजाराे लातूरकर गावाकडे मतदानासाठी शनिवारी रात्री निघाले हाेते. दरम्यान, त्यांनी पुणे रेल्वेस्थानकावर गर्दी केली. मुंबई-बीदर एक्सप्रेस पुणे रेल्वेस्थानकावर वेळवर दाखल झाली. मुंबईवरुनच रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली हाेती. पुणे रेल्वेस्थानकावर रेल्वे दाखल झाल्यावर... रेल्वेत जागा नसल्याच्या कारणाने आतील प्रवाशांनी दरवाजे घडले नाहीत. पुणे आणि परिसरात राहणारे हजाराे लातूरकर गावाकडे येत हाेते. त्यावेळी रेल्वेत जागा नव्हती. परिस्थिती लक्षा घेत लाेकांनी उत्स्फूर्तपणे रेल्वे इंजिनसामाेर ठिय्या मांडला. जाेरजाेरात घाेषणाबाजी सुरु केली. महिला, तरुण मुलांचा आंदाेलनात सहभाग हाेता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे पाेलीस दाखल झाले. नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजे उघडल्याशिवाय, सर्व प्रवासी रेल्वेत बसल्याशिवाय रेल्वे जाग्यावरुन हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका लातूरच्या प्रवाशांनी घेतली. लातूरकरांना जागा नसल्याच्या विराेधात संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शेवटी रेल्वे पाेलिसांनी उघडले दरवाजे...
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने रेल्वे पाेलिसांनी पुढकार घेत रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे उघडले. सर्व प्रवांशाना रेल्वेत बसवण्यात जवळपास दाेन तासांचा कालावधी गेला. जवळपास दाेन तास उशिराने लातूर-बीदर एक्सप्रेस रेल्वे मार्गस्थ झाली.
लातुरात उशिराने दाखल झाली रेल्वे...
दरराेज निर्धारित वेळेवर लातूरच्या रेल्वे स्थानकावर दाखल हाेणारी मुंबई एक्सप्रेस आज दाेन तास उशिराने दाखल झाली. सकाळी सहा वाजता येणारी रेल्वे आज मात्र, आठ वाजता दाखल झाली. परिणामी, ग्रामीण भागातील हजाराे प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड झाली.
- बिमलकुमार तिवारी,
रेल्वे वाहतूक निरीक्षक, लातूर