लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय
By संदीप शिंदे | Published: August 28, 2023 03:48 PM2023-08-28T15:48:35+5:302023-08-28T15:48:50+5:30
लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात.
तांदुळजा : लातूर-कळंब मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेसचे नियोजन नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कधी एकाच वेळी दोन बसेस येतात तर कधी दोन तास एकही बस येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. त्यातच नादुरुस्त बसेस या मार्गावर पाठविल्या जात असल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याकडे महामंडळाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मे ते जुलै या महिन्यात बससेवा तोट्यातून फायद्यात आणण्यात लातूर आगार यशस्वी ठरले. या तीन महिन्यांत १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा लातूर आगाराचा व्यवसाय झाला आहे. तर तीन कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावरून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येते. दरम्यान, लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात. तर काही बसेस नादुरुस्त असतात. त्यातच रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर बसेसच्या खिडक्या तुटून पडणे, बसमध्ये अचानक बिघाड होणे अशा समस्या निर्माण होत आहेत.
२६ ऑगस्ट राेजी सकाळी कळंब आगाराची बस अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे दोन तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. कधी-कधी एकाच वेळी दोन ते तीन बसेस येतात. यातील दोन बस तर रिकाम्याच असतात. तर कधी बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लातूर आणि कळंब आगाराने चांगल्या बसेस या मार्गावर द्याव्यात, बसेसचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी लातूर-कळंब मार्गावरील प्रवाशांमधून होत आहे.
विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय दूर करणार...
लातूर-तांदुळजामार्गे कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस धावतत. वेळेचे नियोजन आणि वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे लातूर बसस्थानकप्रमुख हनुमंत चपटे यांनी सांगितले. तर कळंबचे आगारप्रमुख प्रशांत करवंदे म्हणाले, कळंब, शिराढोण, तांदुळजामार्गे लातूर या मार्गावर चार बस सेवा देतात. उत्कृष्ट सेवा देण्यासाठी वेळेचे नियोजन करून वेळापत्रक तयार करू.
महामंडळ प्रशासनाने लक्ष द्यावे...
लातूर-तांदुळजामार्गे कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस व कळंब आगाराच्या चार बसेस चालतात. या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने महामंडळासही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, या मार्गावरील सर्वच बसेसची दुरवस्था झाली आहे. काही बसेस रस्त्याचे काम सुरू असल्याने अचानक बंद पडतात. त्यामुळे लातूर आणि कळंब आगाराने याकडे लक्ष देण्याची आवश्यक असल्याचे ॲड. अनंतराव बावणे म्हणाले.