लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

By संदीप शिंदे | Published: August 4, 2022 08:03 PM2022-08-04T20:03:29+5:302022-08-04T20:05:13+5:30

बाला उपक्रम : एकाच वर्षात तीन हजारांनी वाढली पटसंख्या 

The power of public participation! Zilla Parishad schools brightened up with 3 crore people | लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

लोकसहभागाची ताकद! ३ कोटींच्या लोकवाट्याने उजळल्या जिल्हा परिषद शाळा, पटसंख्या वाढली

Next

- संदीप शिंदे
लातूर :
सध्याच्या काळात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दरवर्षी खालावत होती. खेड्यापाड्यातीलही पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच शिक्षण देण्याचा ध्यास घेतला होता. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या बाला उपक्रमामुळे गावातील नागरिकांनी गावची शाळाच समृध्द करुन पाल्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळवून देऊ असा मनोदय केला. त्यामुळेच दोन वर्षांत जिल्ह्यातील शाळांसाठी ३ कोटींचा लोकवाटा जमा झाला आणि त्यातून शाळा उजळल्या आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड अर्थात बाला उपक्रम २०२० पासून सुरु करण्यात आला. जिल्ह्यात एकूण १ हजार २७८ शाळा असून २०२०-२१ च्या पहिल्या टप्प्यात ५०० शाळांची निवड करण्यात आली. उपक्रमाअंतर्गत शाळेच्या इमारतीचे बांधकाम, रंगरंगोटी, शालेय परिसरातील झाडांभोवती भौमितिक आकाराचे कठडे बांधणे, दिव्यांग मुलांसाठी रॅम्प, सौरघड्याळ, लपंडाव भिंत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅसची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, गिलाव्यावर अक्षर- अंक, खिडक्यांच्या लोखंडी ग्रिलचा अक्षर ओळखसाठी उपयोग, रिकाम्या जागेत निसर्ग शाळा उभारणे, मैलाचे दगड, दिशादर्शक फलक, खुली जीम उभारणे, विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार फलक लावणे, छतावरील पंख्यांना आकर्षक रंगरंगोटी करणे, वर्गातील फरशीवर बाराखडी, सापसिडी साकारणे, वर्गखोल्यांची लांबी-रुंदी दर्शविणे, पत्रपेटी, जुन्या टायरपासून झोका तयार करणे, सूर्यमाला, पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची झाडावर सोय करणे आदींचा समावेश असल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने दुसऱ्या वर्षी ५०० शाळांची निवड करण्यात आली आहे. 

सेस फंडातून एक कोटींची तरतूद...
बाला उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पहिल्या वर्षी ४९ लाख ८७ हजार तर दुसऱ्या वर्षी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ३ कोटींचा लोकवाटा दिला आहे.

आनंददायी वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण...
बाला उपक्रमातून शाळांची रंगरंगोटीच नव्हे तर अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पारंपारिकबरोबरच अपारंपारिक पध्दतीने आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम आहे.
- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: The power of public participation! Zilla Parishad schools brightened up with 3 crore people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.