राष्ट्रपती म्हणाल्या, सृष्टी, तू तर भारतकन्या...! १२७ तासांचा नृत्याविष्कार
By संदीप शिंदे | Published: September 6, 2023 10:40 PM2023-09-06T22:40:54+5:302023-09-06T22:41:08+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला सृष्टी जगतापचा सत्कार
लातूर : सलग १२७ तासांचा नृत्याविष्कार करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताचे नाव नोंदविणाऱ्या लातूर येथील सृष्टी जगताप हिच्या विश्वविक्रमाचा प्रवास जाणून घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सृष्टीला ‘तू तर भारतकन्या आहेस,’ या शब्दांत तिचा गौरव केला. जिद्द, धैर्य, अपार कष्ट आणि गुणवत्ता असणाऱ्या देशातील मुली उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती भवनात बुधवारी हा सत्कार झाला. सृष्टीने पाच रात्री आणि सहा दिवसांमध्ये योगनिद्रेद्वारे केवळ काही मिनिटांची केलेली विश्रांती वगळता सलग १२७ तास नृत्य करून नेपाळच्या नावावरील रेकॉर्ड भारताच्या नावावर नोंदविले. या नृत्यप्रवासाची तयारी आणि प्रत्यक्ष नृत्याविष्कार यांचे कौतुक करीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, मुलींनी असंच असलं पाहिजे. ध्येयनिष्ठ, खंबीर आणि नव्याचा शोध घेणारे.
तू कोणत्याही क्षेत्रात करिअर कर; परंतु कला सोडू नको. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त सृष्टीने केलेला संकल्प प्रेरणादायी आहे. यावेळी राष्ट्रपतींनी कला क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केलेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांचे उदाहरण दिले. सृष्टी कथ्थकमध्ये पदवीधर आहे. दहावीला १०० टक्के गुण मिळवून आता बारावीत शिकते आहे. याचेही कौतुक करीत राष्ट्रपतींनी तिच्यासोबत असलेल्या लहान बहीण श्रीजाचेही कौतुक केले. दोघींनाही राष्ट्रपतींनी शालेय साहित्य व चॉकलेट भेट दिली. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, सृष्टीचे वडील सुधीर आणि संजीवनी जगताप व बहीण श्रीजा उपस्थित होते.
तू झोपेवर नियंत्रण कसे केलेस?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुतूहलाने सृष्टीला विचारले, पाच दिवस झोपेवर नियंत्रण कसे केलेस? योगनिद्रा कशी अवगत केलीस? जे केलेस, त्याचे परिणाम सर्वोत्तम आहेत. आता मुली कुठेच कमी नाहीत. किंबहुना अधिक जबाबदारी घेतात. परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही. राष्ट्रपती म्हणाल्या, मीही सासर आणि माहेरला जोडून ठेवले आहे आणि सर्व मुली हेच करतात. महिला सर्व परिस्थितीत सक्षमपणे उभ्या राहतात. तुझ्यासारख्या विश्वविक्रमांनी आणखी कित्येकींना बळ मिळते.