आरटीई प्रवेशासाठी जुन्याच पद्धतीने होणार प्रक्रिया; पुन्हा अर्ज भरताना 'या' बाबी आहेत आवश्यक...

By संदीप शिंदे | Published: May 17, 2024 04:51 PM2024-05-17T16:51:48+5:302024-05-17T16:52:31+5:30

शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहेत.

The procedure for RTE admission will be the same as before; These things are required while filling the application… | आरटीई प्रवेशासाठी जुन्याच पद्धतीने होणार प्रक्रिया; पुन्हा अर्ज भरताना 'या' बाबी आहेत आवश्यक...

आरटीई प्रवेशासाठी जुन्याच पद्धतीने होणार प्रक्रिया; पुन्हा अर्ज भरताना 'या' बाबी आहेत आवश्यक...

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पद्धतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी १७ मेपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, ३१ मेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत नवीन नियमानुसार जिल्हा परिषद, मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इंग्रजी शाळांचा पर्याय येत नव्हता. विशेष म्हणजे १७०० हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती. यात २२ हजार जागा भरल्या जाणार होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १२०० अर्ज या प्रक्रियेसाठी दाखल झाले होते. त्यातच शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी १७ मे अर्थात शुक्रवारपासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. ३१ मेपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याची संधी जुन्या नियमामुळे मिळणार आहे. दरम्यान, स्वंय अर्थसहायित शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया पार पाडली असून, आता शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहेत.

पोर्टलवर २१४ शाळांत १८५७ जागा...
आरटीई पोर्टलवर जुन्या नियमानुसार दाखविण्यात येणाऱ्या शाळा, जागांची माहिती हटविण्यात आली असून, नवीन माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडे २१४ शाळांनी नोंदणी केली असून, यामध्ये १ हजार ८५७ जागा भरण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत किती अर्ज येणार याकडे लक्ष असून, त्यानंतरच राज्यस्तरावरुन सोडत काढण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सुचनाही आल्या असल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

पालकांना पुन्हा अर्ज करावा लागणार...
नवीन नियमानुसार आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत होती. यामध्ये २२ हजार जागांसाठी केवळ १२०० अर्ज आले होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत असून, पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत. ३१ मेपर्यंत मुदत असून, निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये १ हजार ८५७ जागांवर प्रवेश होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शाळा सुरु होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया...
आरटीई प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनानुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे. शाळा सुरु होण्यपूर्वी प्रक्रिया राबविण्याचे आव्हान आहे.

अर्ज भरताना या बाबी आहेत आवश्यक...
आर्थिक वर्षांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांचा दुर्बल घटकात समावेश होतो. प्रवेश प्रक्रियेकरता अर्ज भरताना १० शाळांची निवड करावी, अर्ज परिपूर्ण भरावा, शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपकडून निश्चित करण्यात आलेले आहे. अर्जाबाबत काही तक्रार असल्यास पोर्टलवर स्वतंत्र साईड देण्यात आली आहे. निवासी पूरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Web Title: The procedure for RTE admission will be the same as before; These things are required while filling the application…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.