सेवालयामध्ये सुरू झाली लगीनघाई; एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे विवाह जुळले !
By राजकुमार जोंधळे | Published: April 17, 2023 07:10 PM2023-04-17T19:10:29+5:302023-04-17T19:11:22+5:30
सेवालयाचा पहिला लाभार्थी अडकणार विवाहबंधनात...
लातूर : लातूर शहरानजीक हासेगाव (ता. औसा) येथील सेवालयात असलेल्या एचआयव्ही संक्रमित पाच सज्ञान जोडप्यांचे विवाह जुळविण्यात आले आहेत. त्यांचा सामूहिक विवाह सोहळा शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता सेवालयाजवळील हॅप्पी इंडियन व्हिलेज येथे होणार आहे.
एचआयव्ही संक्रमित बालकांचा सांभाळ करण्यासाठी लातूरनजीक हासेगाव येथे प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी सेवालयात दाखल झालेली बालके आता सज्ञान झाली आहेत. आतापर्यंत १८ जणांचे विवाह झाले असून, सात जोडपे हॅप्पी व्हिलेजवर राहत आहेत. या जोडप्यांना एचआयव्ही मुक्त मुलं जन्मली आहेत. आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. आता अन्य एचआयव्ही संक्रमित सज्ञान पाच जोडप्यांचे विवाह प्रा. रवी बापटले यांनी जुळविले आहेत. ते विवाह येत्या शनिवारी, २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत.
यावेळी वधू-वरांचे पालक म्हणून औशाचे आमदार अभिमन्यू पवार, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ. अशोक गाणू, डॉ. हनुमंत किणीकर, प्रिया लातूरकर, प्रा.डॉ. रुपाली गोरे, अॅड. दीपक बनसुडे, डॉ. पवन चांडक, राजकुमार महाशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एचआयव्ही संक्रमित सज्ञान वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सेवालय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सेवालयाचा पहिला लाभार्थी शहाजी अडकणार विवाहबंधनात...
प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलांच्या सांभाळासाठी सेवालय हा प्रकल्प सुरु केला. त्यानंतर पहिल्यांदा येथे शहाजी नावाच्या बालकाचे आगमन झाले. दिसायला अतिशय गोंडस, मितभाषी असणारा शहाजी हळूहळू सर्वांचा लाडका झाला. त्याच्या प्रवेशानंतर आज सेवालयात सुमारे १०० पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित बालके आणि सज्ञान मुले-मुली वास्तव्याला आहेत. पहिला लाभार्थी असलेला शहाजी आता २३ वर्षांचा झाला आहे. त्याचाही विवाह या सामूहिक विवाह सोहळ्यात होणार आहे.