सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

By राजकुमार जोंधळे | Published: June 17, 2023 07:38 PM2023-06-17T19:38:12+5:302023-06-17T19:38:31+5:30

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, चाैकशीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त

The security guard became a doctor, saline was applied to the patient; incident in Government Hospital, Latur | सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

googlenewsNext

लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला सुरक्षा रक्षकानेच सलाइन लावल्याचा व्हिडीओ साेशल मीडियात शनिवारी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकाराने रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेच्या चाैकशीसाठी तिघांची उच्चस्तरीय समिती शनिवारी सकाळी नियुक्त केली आहे.

रेणापूर तालुक्यातील एका गावात हाणामारीमध्ये जखमी झालेल्या बशीर शेख यांना लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वाॅर्ड क्रमांक २१ मध्ये दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यावेळी रुग्णालयात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बशीर शेख यांना सलाइन लावल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला. यावेळी उपस्थित असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी आक्षेप घेत रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. उदय माेहिते यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, घडल्या प्रकाराचा व्हिडीओ अधिष्ठाता डाॅ. माेहिते यांनी पाहिला आणि तातडीने या घटनेची दखल घेतली. या प्रकाराची गंभीरतेने दखल घेत तीन सदस्य असलेल्या उच्चस्तरीय समितीची शनिवारी नियुक्ती केली. या चाैकशी समितीत वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सचिन जाधव, डाॅ. सुषमा जाधव आणि अधिसेविका राजश्री हरंगुळे या तिघांचा समावेश आहे. त्यांना या घटनेची चाैकशी करून, दाेन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाला अन् उडाली खळबळ...
लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या बशीर शेख या रुग्णास चक्क रुग्णालयातील सुरक्षा रक्षकानेच सलाइन लावल्याचा व्हिडीओ शनिवारी साेशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर प्रकाराची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने समिती नियुक्त करून, चाैकशीचे आदेश दिले आहेत. या समितीच्या चाैकशीतून नेमके काय घडले? हे समाेर येणार आहे.

चाैकशीनंतरच सत्य समाेर येणार
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला सुरक्षा रक्षकाने सलाइन लावल्याचा प्रकार समाेर आला. यावेळी रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपस्थित हाेते. असे असताना हा प्रकार कसा घडला, याची चाैकशी सध्याला सुरू आहे. चाैकशीअंती सत्य समाेर येईल. दाेषी आढळणाऱ्यावर याेग्य ती कारवाई केली जाईल. 
-डाॅ. उदय माेहिते, प्रभारी अधिष्ठाता, लातूर

Web Title: The security guard became a doctor, saline was applied to the patient; incident in Government Hospital, Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.