शटरची पट्टी ताेडून शॉपी फोडली; दीड लाखांचे मोबाईल लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: November 9, 2022 07:12 PM2022-11-09T19:12:50+5:302022-11-09T19:13:10+5:30
ऐन बसस्थानकासमाेर असलेल्या शॉपीत झाली चोरी
लातूर : बसस्थानकासमाेर असलेली माेबाइल शाॅपी अज्ञात चाेरट्यांनी फाेडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना चाकूर येथे ६ ते ७ नाेव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संदीप नामदेव पाेतदार (वय ४० रा. श्रीनगर, नांदेड राेड, चाकूर) यांचे बसस्थानकासमाेर माेबाइल अँड डिस्ट्रिब्युटर्स नावाची शाॅपी आहे. दरम्यान, ६ नाेव्हेंबर राेजी फिर्यादी हे दुकान बंद करुन घराकडे गेले हाेते. रात्रीच्या वेळी अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी ताेडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवण्यात आलेले विविध कंपनीचे दहा माेबाइल आणि हॅण्डवाॅच असा एकूण १ लाख ४४ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ६ ते ७ नाेव्हेंबरच्या दरम्यान घडली. साेमवारी सकाळी दुकानाकडे आल्यानंतर आपले दुकान फाेडल्याचे फिर्यादी संदीप पाेतदार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती चाकूर ठाण्याला दिली. घटनास्थळी चाकूर पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहेकाॅ. गुंडरे करत आहेत.