शेतीच्या वाटणीवरून मुलानेच केला आईचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:25 PM2024-03-09T14:25:55+5:302024-03-09T14:26:18+5:30
आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखूबाई तुळशीराम वाघमारे (५५) यांचा कोयत्याने खून केल्याची घटना २४ फेब्रुवारीला उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
नागनाथ तुळशीराम वाघमारे (३९) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याच्या कपाळावर खरचटलेली जखम दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी विचारले असता, पत्नीची बांगडी लागल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीला विचारले असता, तिने असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यानंतर २९ फेब्रुवारीला नागनाथला ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली.
सदऱ्याच्या तुकड्याने केला उलगडा
आरोपीने आईचा खून केल्यानंतर स्वतःचे रक्ताने माखलेले कपडे रात्रीच मोकळ्या जागेत जाळले. शर्टाचा तुकडा शिल्लक राहिला होता. तो कपडा नातेवाइकांना दाखविल्यानंतर त्यांनी नागनाथ वाघमारे याच्या शर्टचा तुकडा असल्याचे ओळखले.