लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद

By राजकुमार जोंधळे | Published: July 18, 2023 07:07 PM2023-07-18T19:07:25+5:302023-07-18T19:07:39+5:30

कबड्डी दिनाचे औचित्य साधून लोकमतने 'क्रीडा संकुलात दबतोय कबड्डीचा आवाज' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

The sound of kabaddi will reverberate in Latur's sports complex; The joy of the player as the field became available | लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद

लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज; मैदान उपलब्ध झाल्याने खेळाडूत आनंद

googlenewsNext

- महेश पाळणे
लातूर :
मराठमोळ्या असलेल्या देशी खेळ कबड्डीला क्रीडा संकुलात अडचणींमुळे जागा नव्हती. त्यामुळे कबड्डी खेळाचा आवाज दबला होता. याबाबत लोकमतने राष्ट्रीय कबड्डी दिनी वृत्त प्रकाशित करून विषय ऐरणीवर आणला होता. याची क्रीडा विभागाने दखल घेत क्रीडा संकुलात कबड्डी खेळासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता शहरातील क्रीडा संकुलात कबड्डी... कबड्डी... असा आवाज घुमणार आहे. 

कबड्डी दिनाचे औचित्य साधून लोकमतने 'क्रीडा संकुलात दबतोय कबड्डीचा आवाज' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावर क्रीडा विभागानेही प्रतिसाद देत क्रीडा संकुलातील मुख्य मैदानाशेजारी असलेल्या ४०० मीटर धावन पथाजवळ कबड्डी खेळासाठी एक मैदान उपलब्ध करून दिले आहे. कबड्डी दिनापासून सरावाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्रीडा विभागालाही स्पर्धेसाठी बॅडमिंटन हॉलचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, आता मैदान उपलब्ध करून दिल्याने खेळाडूंना दैनंदिन सरावाला वाव मिळणार आहे.

सातत्य राहणे गरजेचे...
क्रीडा विभागाने कबड्डी खेळासाठी मैदान उपलब्ध करून दिले असले तरी जिल्हा संघटना व माजी खेळाडूंना सरावासाठी वेळ देणे गरजेचे आहे. जेणेकरून दैनंदिन कबड्डीचा सराव संकुलात दिसेल. मार्गदर्शक लक्ष्मण बेल्लाळे, ज्ञानोबा लहाने, लालबा कावळे, सतीश लोभे यांनी क्रीडा संकुलात कबड्डीच्या सरावाला सुरुवात केली आहे. अधिकाधिक खेळाडू कसे सहभागी होतील व त्यासाठीचे सातत्य राहणेही गरजेचे आहे.

ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही मिळावा वाव...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमतो. तेथील मैदानेही खेळाडूंनी भरलेली असतात. विशेषत: रेणापूर, काटगाव, भीसेवाघोली, अहमदपूर, नागलगाव व उदगीर येथे कबड्डीचे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. हीच संस्कृती शहरातही चालली तर भावी कबड्डीपटू पुढे येतील.

Web Title: The sound of kabaddi will reverberate in Latur's sports complex; The joy of the player as the field became available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.