९ वर्षांपूर्वी पळविलेली राज्य व्हॉलीबॉल स्पर्धा पुन्हा लातूरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:09 PM2022-12-17T18:09:07+5:302022-12-17T18:11:28+5:30
यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज चषक लातुरात होणार असल्याने व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद
- महेश पाळणे
लातूर : २०१३ साली घोषित झालेली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा डॉज देत ऐनवेळी मुंबईत हलविण्यात आली होती. याची खंत अनेक दिवस लातूरच्या व्हॉलीबॉलप्रेमीत होती. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धा लातूरला घेण्याचे राज्याच्या क्रीडा विभागाने घोषित केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही स्पर्धा लातूरच्या मैदानावर होणार हे मात्र, नक्की झाले आहे. परिणामी, व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.
क्रीडा मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २००९ रोजी कुस्ती, कब्बडी, खो-खो प्रमाणे व्हॉलीबॉलसाठी शासनस्तरावर स्वतंत्र्य राज्यस्तर स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. पहिली स्पर्धा १५ ते २१ मे २०११ दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. यावेळी १९ लाखांचे या स्पर्धेला अनुदान होते. आता यात वाढ करुन ५० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा लातूरात होणार असल्याने लातूरच्या व्हॉलीबॉलला बळ मिळणार आहे.
निधी येऊन गेला परत...
२०१३ मध्ये लातूरला स्पर्धा जाहीर झाली होती. यासाठी निधीही आला होता. मात्र, ऐनवेळी ही स्पर्धा मुंबईला हलविली. त्यामुळे आलेला निधी परत गेला होता. आता या स्पर्धेसाठी ५० लाखांचा निधी असून, विजेत्या संघास १.२५ लाख व उपविजेत्या संघास ७५ हजार रोख बक्षीसासह चषक देण्यात येणार आहे.
दोन वयोगटात स्पर्धा...
व्हॉलीबॉल संघटनेच्या ज्युनिअर (१८ वर्षांखालील), युथ (२१ वर्षांखालील) अशा दोन गटात स्पर्धा होणार असून, राज्यातील ८ विभागातील ३२ संघांचा यात समावेश राहणार असून, ३८४ खेळाडूंसह प्रशिक्षक, पंच, व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.
चार खेळांच्या स्पर्धा...
राज्याच्या क्रीडा आयुक्तांनी शासनस्तरावरील २०२२-२३ या स्पर्धांचे ठिकाण निश्चित केले असून, छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा लातूरात, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कब्बडी स्पर्धा जळगाव, खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा धुळे व भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खाे स्पर्धा नागपुर येथे होणार आहे.
क्रीडा विभागाकडून तयारी...
लातूरच्या क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा कार्यालयाने या स्पर्धेसाठी कंबर कसली असून, जिल्ह्यातील आजी-माजी खेळाडूंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुरुवातीला याबाबत बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम नियोजनासाठी बैठक पार पडणार आहे.