शेतकऱ्यांचा ‘सुप्रीम’ आधार कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली, जिल्हाधिकारीपदी सचिन ओम्बासे
By आशपाक पठाण | Published: September 30, 2022 12:23 PM2022-09-30T12:23:16+5:302022-09-30T12:28:19+5:30
उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, तर लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल जळगावचे जिल्हाधिकारी
लातूर : वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे हे उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. यासंदर्भातचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा काढले. जिल्हाधिकारी ओम्बासे हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
दरम्यान, उस्मानाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास प्रकल्पाच्या संचालकपदावर बदली झाली आहे. लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे, तर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड येथे बदली झाली आहे.
कृषी, ग्रामविकासात पथदर्शी काम, दिवेगावकर प्रकल्प संचालकपदी
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विमा कंपन्यांच्या यंत्रणेतील त्रुटी शोधल्या. त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे कंपनीविरुद्ध अनेक दावे उभे राहिले. आता कंपन्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कोट्यवधींची नुकसानभरपाई द्यावी लागेल. तुळजाभवानी देवीचे पारंपरिक मंकावती कुंडासारख्या प्रकरणात अवैध हस्तांतरण रोखले, अतिक्रमणे काढली, अनेकांवर गुन्हेही दाखल केले. जिल्ह्यातील इनामी जमिनीचे गैरव्यवहार शोधून काढून २,७०० हेक्टर्सपेक्षा अधिक जमिनींची प्रकरणे निकाली निघाली. कोविड काळात ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर शासकीय रुग्णालयातच उपचार घेत सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास वाढविला. शेतकऱ्यांना ‘सुप्रीम’ आधार, तुळजापूरच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक वारशाचे जतन अन् अतिवृष्टी, कोविडसारख्या नैसर्गिक संकटात पालकत्वाची भूमिका बजावणे ही कामे उस्मानाबादकरांसाठी शीर्षस्थानी राहतील.