कपड्याच्या शिलाईवरुन दाेघाकडून टेलरला मारहाण
By राजकुमार जोंधळे | Published: October 4, 2022 07:34 PM2022-10-04T19:34:54+5:302022-10-04T19:35:27+5:30
गातेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लातूर : शिवलेले कपडे उधार देण्याच्या कारणावरुन टेलरला दाेघांनी मारहाण केल्याची घटना लातूर तालुक्यातील रुई -रामेश्वर येथे साेमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गातेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राहूल गाेपीनाथ साेनवणे (वय ३५) यांचा गावात टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात कपडे शिलाईसाठी टाकण्यात आले हाेते. दरम्यान, साेमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गावातीलच शामसुंदर निवृत्ती लहाडे हा दुकानात आला. दरम्यान, फिर्यादीकडे कपडे मागितले. यावर त्यांनी शिलाई देण्याबाबत सांगितले. उधार कपडे देण्यावरुन दाेघामध्ये वादावादी झाली. दरम्यान, शामसुंदर लहाडे यांचा मुलगा किशाेर लहाडे हा तेथे आला. या दाेघांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
याबाबत गातेगावा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन साेमवारी रात्री उशिरा शामसुंदर लहाडे आणि किशाेर लहाडे याच्याविराेधात अॅट्रासिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाेलीस उपनिरीक्षक किशाेर कांबळे यांनी सांगितले. तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सुनील गाेसावी करत आहेत.