चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 07:12 PM2022-01-29T19:12:51+5:302022-01-29T19:13:16+5:30
एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला
लातूर : शहरातील कन्हेरी चाैक परिसरात असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बॅंकेचे एटीएम मशीन जागेवरुन उखडून बाहेर उभ्या असलेल्या एका जीपमध्ये टाकताना आवाज झाला आणि परिसरातील नागरिक जागे झाले. यानंतर नागरिकांनी गस्तीवर असलेल्या पाेलिसांना तातडीने फाेनवर ही माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी पाेलीस येत असल्याची खबर लागताच चाेरटे पसार झाले. स्थानिक नागरिक आणि पाेलिसांच्या सतर्कतेमुळे बॅंकेची जवळपास १६ लाखांची राेकड वाचली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील रिंग राेड परिसरातील कन्हेरी चाैकात एसबीआय बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चाेरट्यांनी ही एटीएम मशीन कटर अथवा गॅस कटरसारख्या माध्यमाचा वापर करुन जाग्यावरुन उखडली. दरम्यान, एटीएम मशीनच चाेरट्यांनी बाहेर उभ्या केलेल्या जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक जीपमध्ये टाकताना आवाज झाला. या आवाजाने शेजारी राहणारे काही नागरिक जागे झाले. त्यांनी तातडीने गस्तीवर असलेल्या पाेलिसांना फाेनवर संपर्क साधून याची माहिती दिली. रात्रीच्या वेळी पाेलीस विविध भागात गस्तीवर हाेते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीपमध्ये एटीएम मशीन काेंबण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाेरट्यांना पाेलीस आल्याची कुणकूण लागली. त्यामुळे एटीएम मशीन जागेवरच टाकून चोरटे जीपने पसार झाले.
जीप सापडली चाकूर हद्दीत...
चाेरट्यांची जीप चाकूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलिसांना सापडली. एटीएम फाेडणारी टाेळी बहुदा आंतरजिल्ह्यातील असावी, असा संशय पाेलिसांना आहे. चाेरट्यांनी ही जीप चाकूर येथील एका एटीएम सेंटरसमाेर थांबवली हाेती. तेथेही गस्तीवरील पाेलीस आल्याची कुणकूण लागताच जीप जाग्यावरच साेडून ते पसार झाले, अशी माहिती समाेर आली आहे.
चाेरीतील जीपचा गुन्ह्यात वापर...
चाकूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेली जीप हिंगाेली जिल्ह्यातील हट्टा येथील असल्याचे समाेर आले आहे. चाेरट्यांनी ती जीप चाेरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लातूर आणि चाकूर येथील एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न फसला आहे. लातुरात नागरिक आणि चाकुरात पाेलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम मशीन चाेरट्यांना पळवता आली नाही.