लातूरच्या तिकडीने क्रीडा महोत्सव सोडली छाप ! व्हॉलीबॉलमध्ये विद्यापीठास मिळवून दिले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:33 PM2022-12-07T18:33:33+5:302022-12-07T18:34:28+5:30
प्रल्हाद, शोएब, मारुती यांच्या खेळीने सुवर्णकिमया
- महेश पाळणे
लातूर : उत्कृष्ट अष्टपैलू खेळी व स्मॅशचा जोरदार हल्ला चढवित लातूरच्या त्रिकुटांनी औरंगाबाद येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात छाप सोडत आपल्या विद्यापीठास सुवर्णपदक पटकावून दिले. व्हॉलीबॉल खेळात लातूरचा नेहमीच दबदबा असतो. ही लय कायम ठेवत लातूरच्या प्रल्हाद सोमवंशी, शोएब शेख व मारुती हासुळे यांनी सुवर्णकिमया साधली.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून क्रीडा महोत्सव सुरु होता. या स्पर्धेत लातूरच्या महाराष्ट्र क्लबचा खेळाडू प्रल्हाद सोमवंशी हा यजमान औरंगाबाद विद्यापीठाचा कर्णधार होता. या सोबतच फ्रेंडस क्लब लातूरचा शोएब शेख व वाढवण्याच्या यशवंत क्लबचा मारोती हासुळे या तिघांनी जाेरदार खेळांचे प्रदर्शन करीत संघास विजेतेपद मिळवून दिले. यापुर्वीही लातूरच्या व्हॉलीबॉल पटूंनी नांदेड व औरंगाबाद येथील विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आपल्या संघास यश मिळवून दिले आहे. कोरोनानंतर झालेल्या या स्पर्धेत आपला दबादबा कायम ठेवला आहे. या खेळीचे व्हॉलीबॉल क्षेत्रातून कौतूक होत आहे.
नागपूर-मुंबई विद्यापीठावर मात...
अंतिम सामन्यात या तिघांच्या खेळीच्या जोरावर यजमान औरंगाबाद विद्यापीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुरचा ३-१ ने पराभव केला. तत्पुर्वी उपांत्य सामन्यात मुंबई विद्यापीठाचा ३-० असा एकतर्फी धुव्वा उडविला. सुरुवातीच्या लिग सामन्यात कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या संघाचा पराभव केला.
अष्टपैलू, स्मॅश हीट कामगिरी...
कर्णधार असलेल्या प्रल्हाद सोमवंशीने अष्टपैलू खेळी करीत संघास आघाडी मिळवून दिली. यासह काऊंटर अटॅकर म्हणून खेळणाऱ्या शोएब शेख व मारोती हासोळे यांनी प्रतिस्पर्ध्यांचे ब्लॉक चुकवित जोरदार स्मॅशींग केली. या लातूरकर खेळाडूंच्या खेळीने औरंगाबाद विद्यापीठास २०१४ नंतर पुन्हा सुवर्णपदक मिळवून दिले. लिग व नॉकआऊट सामन्यात या तिघांची खेळी तुफानी होती. संघातील अन्य खेळाडूंसाेबत उत्कृष्ट ताळमेळ राखत लातूरकर खेळाडूंनी आठ वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण किमया साधली.
यापूर्वीही गाजविले होते मैदान...
विद्यापीठ स्पर्धेसह या तिघांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत व्हॉलीबॉल क्षेत्रात मैदान गाजवित लातूरचे नाव उज्वल केले होते. खुल्या स्पर्धेतही हे तिघे एकत्र येऊन अनेकवेळा बक्षीसे जिंकली आहेत. शालेय स्पर्धेपासूनच या खेळाडूंचा दबदबा राहीला आहे. नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही चांगली कामगिरी करुन असा विश्वास या तिघांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.