सिलिंडर स्फाेट दुर्घटनेतील शेवटच्या क्षणाचा थरार..? रामा यांनी सिलिंडर कवटाळले अन् मुलांना पळायला सांगितले..!
By राजकुमार जोंधळे | Published: October 17, 2023 05:29 AM2023-10-17T05:29:02+5:302023-10-17T05:38:32+5:30
या घटनेतील ११ पैकी एक जण बरा झाला असून, साेमवारी सुट्टी मिळाली.
लातूर : फुग्यात हवा भरताना झालेल्या सिलिंडर स्फाेटाच्या दुर्घटनेचा थरार काही जणांनी पाहिला हाेता. रामा नामदेव इंगळे हे मुलांना फुग्यामध्ये हवा भरून देत हाेते. त्यांना सिलिंडर लिकेज अथवा काहीतरी गडबड लक्षात आली असावी, त्यामुळे त्यांनी स्फाेट हाेण्यापूर्वी मुलांना पळा..पळा..असे ओरडून सांगितले अन् शेवटच्या क्षणी सिलिंडर कवटाळले. अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेतील ११ पैकी एक जण बरा झाला असून, साेमवारी सुट्टी मिळाली. उर्वरित दहापैकी आठ जणांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून, दाेघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गंभीर असलेला एकजण खासगीत तर एकजण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. इस्लामपुरा, तावरजा काॅलनी परिसरातील ही घटना रविवारी सायंकाळी घडली हाेती.
बीड जिल्ह्यातील वाघाळा राडी (ता. आंबाजाेगाई) येथील रहिवासी रामा नामदेव इंगळे (वय ५०) हे लातुरातील इस्लामपुरा, तावरजा काॅलनी परिसरात फुगे विक्रीसाठी आले हाेते. दरम्यान, फुग्यामध्ये गॅस सिलिंडरच्या माध्यमातून हवा भरत असताना, त्यांच्या आजूबाजूला मुलांचा घाेळका जमला हाेता. यावेळी अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने ते स्वत: रामा इंगळे ठार झाले तर ११ मुले जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात फुगेविक्रेत्याविराेधात साेमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले.
दाेन जखमी मुले अतिदक्षता विभागात...
११ जखमींपैकी ९ जणांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते. यातील एकाला साेमवारी दुपारी सुट्टी देण्यात आली. तर एक जण ७० टक्के भाजल्याने गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर जनरल वार्डात उपचार सुरू आहेत. - डाॅ. शैलेंद्र चव्हाण, प्रभारी अधिष्ठाता, लातूर