तिकिट शिवशाहीचे; प्रवास साध्या बसने ! एसटीचे नियोजन कोलमडले
By संदीप शिंदे | Published: September 25, 2023 04:35 PM2023-09-25T16:35:57+5:302023-09-25T16:36:44+5:30
प्रवाशांतून नाराजी; निलंगा आगाराचे नियोजन कोलमडले
निलंगा : येथून पुण्याला जाण्यासाठी २२ प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने शिवशाही बसचे तिकिट बुकींग केली होती. मात्र, सोमवारी सकाळी शिवशाही ऐवजी साध्या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागला. निलंगा आगाराचे नियोजन ऐनवेळी कोलमडल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या गणपती व महालक्ष्मी सणानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर अशा विविध भागात नोकरीस असणारे कुटुंबीय आपल्या गावाकडे आले आहे. मात्र आता खाजगी ट्रॅव्हल्स अधिक भाडे घेत असल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसेसना पसंती दिली. त्यानुसार निलंगा-पुणे-वल्लभनगर ही शिवशाही गाडी सोमवारी सकाळी ८.४५ वाजता निघणार होती. त्यामुळे निलंगा शहरातील २२ प्रवाशांनी एमएसईआरटीच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन बुकींग केली. सोमवारी सकाळी बस येण्याच्या वेळेस हे सर्व प्रवासी बसस्थानकावर गेले असता शिवशाही गाडी आलीच नाही.
निलंगा आगाराने याच वेळेत दोन साध्या जादा बसेस गाड्या सोडल्या होत्या. शिवशाही ऐवजी साध्या बसेस आल्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या गाड्यांमध्ये शिवशाहीची बुकिंग केलेल्या प्रवाशांना संबंधित वाहकाने शिवशाहीचा रस्ता दाखवला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आगार प्रमुखांकडे धाव घेतली. मात्र, तेथे अधिकारीच नसल्याने शिवशाही न येण्याचे कारण सांगण्यात आले नाही. दरम्यान, वाहतूक नियंत्रक सिद्धेश्वर रासुरे यांनी शिवशाही गाडी उपलब्ध नसल्यामुळे साध्या बसची सोय करून निलंगा येथील प्रवाशांना पुण्याकडे रवाना केले. यादरम्यानच्या वेळेत प्रवाशांनी शिवशाही व साध्या बसच्या तिकिटाच्या फरकाची रक्कम मागितली. मात्र रक्कम देण्याचा आदेश आल्यावर देण्यात येईल असे सांगण्यात आले. निलंगा आगाराकडे शिवशाही बसच उपलब्ध नाही तर ऑनलाईन बुकींग काबर केली असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
अचानक बस बदलल्याने गैरसोय...
निलंगा आगाराचे नियोजन नसल्याने सोमवारी सकाळी पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. शिवशाही बस उपलब्ध नाही, तर ऑनलाईनमध्ये बस का दाखविली असा सवाल प्रवासी राजेश जाधव, महेश मोरे, सागर जाधव, शीतल मेकाले यांनी उपस्थित केला. अचानक शिवशाही ऐवजी साधी बस असल्याने आमची गैरसोय झाली असल्याची खंत डॉ. विजयालक्ष्मी सूर्यवंशी, अंजली इंगळे यांनी व्यक्त केली. याबाबत आगार प्रमुख अनिल बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता आज शिवशाही नाही तर साध्या बसने प्रवास करा असा सल्ला त्यांनी दिला.