राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते अनावरण
By संदीप शिंदे | Published: February 7, 2023 04:37 PM2023-02-07T16:37:07+5:302023-02-07T16:37:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे.
लातूर : येथील जिल्हा क्रीडा संकूलात १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकरचे (मस्कॉट) अनवावरण क्रीडा मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., सीईओ अभिनव गोयल, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी हे लातूर येथून, तर मुंबई येथून महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. त्यामुळे या स्पर्धेला महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करावे. स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिल्या. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात २०१२ नंतर पहिल्यांदाच मोठ्या स्वरुपाची स्पर्धा होत असून, या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख यांनी क्रीडामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.