प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश
By संदीप शिंदे | Published: July 20, 2024 07:00 PM2024-07-20T19:00:28+5:302024-07-20T19:01:05+5:30
लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत
लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. न्यायालयीन निकालामुळे यंदाच्या प्रक्रियेस स्थगिती मिळाली होती. दरम्यान, आता आरटीईच्या संकेतस्थळावर निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून, सोमवारपासून पालकांना निवडीचे संदेश पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आरटीईसाठी २१५ शाळांची नोंदणी असून, यामध्ये १८६५ जागा आहेत. यंदा ५ हजार ७६५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. दरम्यान, राज्यस्तरीय सोडतीत १७९६ बालकांची निवड झाली असून, सोमवारपासून संदेश येणार आहेत. त्यांना २३ ते ३१ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. शिक्षण विभागाने यंदाच्या आरटीईसाठी नवीन नियामवली जाहीर केली होती. यामध्ये खासगी शाळांना वगळण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. अखेर न्यायालयाने शासनाची नवीन नियमावली रद्द ठरविली असल्याने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता सोमवारपासून आरटीई मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यांना तालुकास्तरावरील निवड समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
६९ जागांवर सोडत बाकी...
जिल्ह्यात आरटीईसाठी २१५ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १ हजार ८६५ जागा असून, सोडतीमध्ये १७९६ बालकांची निवड झाली आहे. तर ६९ जागांवर सोडत काढण्यात आलेली नाही. तसेच ३१ जुलैपर्यंत प्रवेश न घेतलेल्या जागेवर प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना उलटला असल्याने लवकरात लवकर आरटीईची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर शिक्षण विभागाचा भर राहणार आहे.
कागदपत्रांची पडताळणी केली जाणार..
आरटीई प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनानुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे.